आरपीएफ जवानांच्या वर्दीवर लागणार कॅमेरा

0
6

नागपूर  दि. 10:: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील रेल्वे सुरक्षा दल लवकरच आपल्या पेट्रोलिंग पार्टीतील जवानांच्या वर्दीवर ‘बॉडी विअरींग कॅमेरे’ लावणार आहे. या कॅमेऱ्यांची खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पूर्ण झोनस्तरावर याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक रघुवीर सिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक चौहान म्हणाले, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफच्या वतीने ६० रेल्वेगाड्यात रात्री गस्त घालण्यात येते. प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी, चोरीच्या घटनांना आळा बसावा हा या मागील उद्देश आहे. परंतु गस्त घालताना अनेकदा प्रवासी आरपीएफ जवानांवर वसुली तसेच इतर आरोप लावतात. ‘बॉडी विअरींग कॅमेरा’ वर्दीवर असल्यामुळे अशा घटनांना आळा बसेल. यात जवान ड्युटीवर आल्यापासून घरी जाण्याची सुटी होईपर्यंतच्या घटना कॅमेऱ्यात कैद होतील. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर खुल्या बाजारातून १० कॅमेरे खरेदी करण्यात येणार आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील रेल्वे सुरक्षा दल हा इतर झोनच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असलेले झोन आहे. नागपूर विभागात महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, छत्तीसगडचा समावेश आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त ४० टक्के रेल्वेमार्ग आरपीएफच्या नागपूर विभागात येतो. या विभागात एकूण ५२७ पदे मंजूर असून ४६९ कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यात नवे रेल्वेमार्ग, आरपीएफ ठाणे, पोस्टसाठी आरपीएफला अतिरिक्त मनुष्यबळाची गरज आहे. त्यासाठी १ हजार पदांचा प्रस्ताव मुख्यालयातर्फे रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला आरपीएफ नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, आरपीएफचे निरीक्षक उपस्थित होते.