वैनगंगेच्या शुद्धीकरणाला आणखी चार वर्ष-पालकमंत्री बावनकुळे

0
8

भंडारा ,दि.11-जीवनदायनी वैनगंगा नदीला लागलेली अशुद्धतेची कीड दूर करण्यासाठी शासनाकडून सर्वाेतोपरी प्रयत्न सुरू असून वैनगंगेच्या शुद्धीकरण्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी भंडारा येथील विर्शामभवनात दिली. त्यामुळे जिल्हावासीयांना आणखी चार वर्ष दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावा लागणार आहे.
नागपूर जिल्ह्यातून वाहत येणार्‍या नागनदीच्या पाण्यामुळे वैनगंगेचे पाणी दूषित होत आहे. याशिवाय गोसे धरणात पाणी अडविल्यामुळे वैनगंगेचे पाणी थांबले आहे. त्याचा फटका वैनगंगेच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरासह अनेक गावांना बसत आहे. वैनगंगेच्या काठावरील पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाल्या आहेत. याबाबत पालकमंत्री म्हणाले, नागनदीवरील प्रदूषित पाणी रोखण्यासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरू आहेत. आतापर्यंत ७0 टक्के पाणी रोखण्याचे काम झाले असून उर्वरित ३0 टक्के पाणी वैनगंगेत येत आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी चार वर्षांचा कालावधी निश्‍चित लागणार आहे. त्यामुळे दूषित पाण्याची समस्या तूर्तास तरी दूर होण्याची शक्यता धूसर आहे.