प्रतापगडावर उसळला भक्तांचा महापूर

0
41

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे) दि.१३ः: हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखों भाविकांनी मंगळवारी दर्शन घेतले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृध्द महिला-पुरुष, युवक-युवती व बालकांनी ‘महादेवा जातो गा’ चा गजर करीत भाविकांनी गर्दी केली होती. ही यात्रा पाच दिवस चालणार असल्याने येथील गर्दीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.उमरझरी मध्यम पाटबंधारे प्रकल्प पायथ्याशी भगवान शिवमंदिरात जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्याहस्ते दहिकाला फोडण्यात आला.
महाशिवरात्री पर्वावर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे मोठी यात्रा भरते. मांगल्य जपणारा, आनंद देणारा व बंधूभाव वाढविणाºया या उत्सवाला येथे अत्याधिक महत्व व श्रध्दा आहे. हिंदू समाजबांधव महादेव पहाडीवर तर मुस्लिम बांधव ख्वाजा उस्मान गनी हारुनी बाबांचे मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतात. हातात त्रिशूल व मुखात महादेवा जातो गा असा गजर करीत सोमवारपासूनच भाविकांनी येथे गर्दी केली होती. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने यात्रास्थळी वाहतुकीवर निर्बंध घातल्याने वाहनांची गर्दी कमी होती मात्र गावाबाहेर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. प्रतापगड गावाच्या सभोवताल तीन ठिकाणी गावाबाहेरच वाहतूक अडविण्यात आली होती. एस. टी. महामंडळाच्या बसेस व इतर वाहने लांब अंतरावर थांबविण्यात आल्याने भाविकांना बरीच पायपीट करावी लागली.

प्रतापगड येथील समाज मंदिरालगत मनोहरभाई पटले अकादमी व खासदार प्रफुल पटेल यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केले होते. माजी खासदार नाना पटोले यांच्या मित्रमंडळीनी सुध्दा भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. महाप्रसादांच्या ठिकाणी ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावरुन भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात होते. महादेवाची गाणी उद्घोषकांद्वारे वारंवार कानावर ऐकू येत होत्या.

भाविक रस्त्यावर नारळ फोडतात. कवच तसेच रस्त्यावर फेकतात ते इतर भाविकांच्या त्रासदायक ठरुन इजा होऊ नये, तसेच अगरबत्ती, बेल, फुल व कापूर जाळण्यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनातर्फे पहिली पायरी व वरच्या मंदिरात देवकुंडाची व्यवस्था करण्यात आली होती.वरच्या मंदिरात दर्शन घेणारे व दर्शन घेऊन परत येणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती.आरोग्य विभागाच्या वतीने भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी ८ ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राऊत यांचे देखरेखीखाली आरोग्य तपासणी केंद्र व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली. ठिकठिकाणी पेयजल व्यवस्था तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी तालुका प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेºयाची व्यवस्था करण्यात आली. एस.टी. महामंडळाच्या भंडारा, साकोली, गोंदिया व तिरोडा बसस्थानकावरुन भाविकांची वाहतूक सुविधा करुन देण्यात आली होती.

मनसे तर्फे तीर्थक्षेत्र पिंडकेपार येथे फळेवाटप.
मनसे गोंदिया जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्हा, तालुका तसेच शहर कार्यकारिणी तर्फे महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर भक्तांना फळे वाटप करण्यात आले. या निमित्त जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, मिलन रामटेककर, तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे , शहर अध्यक्ष राजेश नागोसे आणि उदय पोफळी, उपशहर अध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, प्रल्हाद बागडे, प्रशांत बागडे, वतन पुरी, जहमत असवानी, अजय माहुरे, रेखा लालवानी, वनिता नागोसे, लक्ष्मी बागडे, प्रतीक नागोसे, शुभम नागोसे, प्रमिला माहुरे, इंदू चौहान आणि चंदू बडवाईक उपस्थित होते.

सभापती श्रीमती कदम यांच्याहस्ते महाप्रसादाचे वितरण
गोंदियाजवळील फुलचूरस्थित शासकीय पालिटेक्निक काॅलेजजवळील नेहरु युवा केंद्राच्यवतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित महाप्रसाजाचे वितरण नगरपरिषद सभापती भावनाताई कदम यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी  फूलचूर ग्रामपंचायत सदस्य ,नागरीक तथा नेहरू यूवा केन्द्र पदाधिकारी उपस्थित होते.श्रीमती कदम यांनी आपल्या प्रभागातील शिवमंदीरासह नागरा, टेमणी, दतोरा व चूलोद येथील महाशिवरात्रीच्या मेळाव्यातही उपस्थिती नोंदवली.