शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू पुसा-ना.अहीर

0
24

चंद्रपूर,दि.14ः-चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यामध्ये गारांसह अवकाळी वादळी पाऊस झाल्याने हजारो हेक्टरमधील रब्बीचा हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करून नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने घोषणा करावी. त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे आर्थिक मदतीकरिता प्रस्ताव तयार करून पाठवावा. राज्य शासनाने केंद्र स्तरावरून मदत घेवून शेतकर्‍यांच्या डोळय़ातील अर्शू पुसावेत अशी सुचना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना फॅक्सव्दारे संदेश पाठविल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली आहे.
मंगळवारला यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील काही गारपीटग्रस्त गावांना ना.हंसराज अहीर यांनी भेट दिली. यवतमाळातील वणी व मारेगांव तालुक्यातील काही गावांचा यात समावेश होता. त्यांनी रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी वणीचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, जि.प. सदस्य बंडू चांदेकर, निळकंठराव धांडे, रमन डोये, गजानन विधाते, राजू येले व घोन्सा शिवारातील शेतकरी बांधव उपस्थित होते.