मायबाप म्हणते अभ्यास कर, मोदी सरकार म्हणते पकोडे तळ

0
17
बेरोजगारांचे आक्रोश आंदोलन
स्टेशन व्यवस्थापकांना दिले निवेदन
गोंदिया,दि.23 : मोदी सरकार के राज मे बेरोजगार रास्ते पे, जाचक अटी रद्द करा, बेरोजगारांना रोजगार द्या, नोकरी आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची, आम्ही सर्वांची एकच भूल कमळाचे फुल, मायबाप म्हणते अभ्यास कर अन् मोदी सरकार म्हणते पकोडे तळ, अशा घोषणा देत बेरोजगार युवकांनी शुक्रवारी (ता.२३) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तहसील कार्यालय येथून गोरेलाल चौकातील रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढला. यात शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवक सहभागी झाले होते. यावेळी युवकांनी सरकारविरूद्ध तीव्र रोष व्यक्त केला.
रेल्वे स्पर्धा परीक्षार्थ्यांवर होणाºया अन्यायाविरोधात बेरोजगार युवा मोर्चाच्यावतीने शुक्रवारी आक्रोश आंदोलन व रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा भरातील युवक यात सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा रेल्वे कार्यालयाजवळ पोहचला. मोर्च्यात सहभागी युवकांनी सरकार आणि रेल्वे बोर्डाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन रेल्वे व्यवस्थापक रवी नारायणकार यांना देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनातून रेल्वे भरती बोर्डाच्या ‘ग्रुप डी’पदाच्या होणाºया भरतीतून आयटीआय अनिवार्यची अट रद्द करावी, कमीत कमी योग्यता दहावी ठेवण्यात यावी, परीक्षा शुल्क ५०० रुपये चालान स्वरुपातील शुल्क वाढ मागे घेऊन नि:शुल्क अर्ज स्विकारण्यात यावे, रेल्वे भरती बोर्डाद्वारे दरवर्षी रोजगार भरती प्रक्रिया अनिवार्य करावी, एमपीएसस, यूपीएससी, शिक्षक भरती व इतर स्पर्धा परीक्षांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, परीक्षेनंतर सहा महिन्यात भरती पूर्ण करावी, महिलांसाठी लागू केलेली शारीरिक चाचणी अट रद्द करून पूर्वीप्रमाणेच भरती प्रक्रिया घेण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.