निमगाव प्रकल्पासह पाणीटंचाईव आ.रहांगडालेंची जिल्हाधिकार्यांशी चर्चा

0
14

तिरोडा,दि.25 : तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निमगाव प्रकल्पासह,अवकाळी गारपीठ,पाणीटंचाई व इतर समस्यांना घेऊन क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकार्याच्या उपस्थित चर्चा घडवून आणली. याबाबत तात्काळ कार्यवाही करून शेतकरी व नागरिकांना लाभ देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी निमगाव प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.
या वेळी आ. रहांगडाले यांच्यासह जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपवनसंरक्षक युवराज, कार्यकारी अभियंता गेडाम, तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी तळपाले, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल निमगडे व जिल्हा निवडणूक अधिकारी शुभांगी आंधळे उपस्थित होते.
आमदार रहांगडाले यांनी, निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाकरिता राज्य शासनाकडून सर्व आवश्यक कारवाई पूर्ण झाली आहे. प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जिल्हास्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी, असे सांगितले. यावर जिल्हाधिकारी काळे यांनी, शासनाशी संपर्क साधून प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. निमगाव प्रकल्पाचे काम येत्या ६० ते ९० दिवसांत सुरु करण्यात येणार असल्याचे आमदार विजय रहांगडाले यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी काळे यांच्या दालनात झालेल्या चर्चेत, जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे. यावर मात करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती घेण्यात आली. तसेच तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील काही गावांत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.
यावर मात करण्यासाठी आराखडा तयार करुन त्वरित बोअरवेल, विहिरींचे खोलीकरण व विहिरीत बोअरवेल तयार करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रहांगडाले यांनी केली.१३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे गोरेगाव क्षेत्रातील आसलपाणी, खुर्शिपार, पात्री, कुऱ्हाडी यासह ४० गावे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. पीक व मालमत्तेचे नुकसान झाले.तिरोडा ताालुक्यातील बोदलकसा (सुकडी) क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले. तर मुंडीकोटा, वडेगाव क्षेत्रात मध्यम तसेच इतर तालुक्यात अल्प नुकसान झाले. सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावर नुकसानग्रस्त भागाचे सर्वे करण्याचे काम सुरू असून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे जिल्हाधिकारी काळे यांनी आ.रहांगडाले यांना सांगितले.