सर्वच पोलीस ठाणे हायटेक करणार- बावनकुळे

0
8

भंडारा,दि.25 : जिल्ह्यातील पोलिसांच्या सक्षमीकरणासोबत जनतेचे संरक्षण महत्त्वाचे आहे. पारंपरिक गुन्हे पध्दतीत आमुलाग्र बदल झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
भंडारा जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजित ‘टेक एक्स्पो २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनिल कुळकर्णी उपस्थित होते.
यावेळी ना.बावनकुळे म्हणाले, भंडारा पोलीस दलाने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. टेक एक्स्पो हे प्रदर्शन पोलिसांच्या आधुनिकी करणाचे महत्त्व विषद करणारे आहे. भंडारा शहरातील गुन्ह्यांवर नजर ठेवण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात येईल. याशिवाय तालुक्याचे शहर व मोठया गावात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाईल. पोलीस विभाग हायटेक करण्यासाठी यापुढेही निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.वीज चोरीचे गुन्हेसुध्दा आता पोलीस ठाण्यात नोंदविण्यासाठी शासन आदेश निर्गमित झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात वीज चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी दोन पोलीस ठाणे असणार आहेत. या ठिकाणीच वीज चोरीचे गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया होईल.
यावेळी आमदार डॉ.परिणय फुके व जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची समयोचित भाषणे झाली. टेक एक्स्पोच्या आयोजनामागची भूमिका जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी प्रास्ताविकातून मांडली. शासनाने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला असून तंत्रज्ञान व सोशल मीडियामध्ये घडणाºया गुन्ह्यांपासून संरक्षण व्हावे याबाबतची माहिती या प्रर्दशनाच्या माध्यमातून जनतेला दिली जाणार आहे. कार्यक्रमाचे संचालन मुकुंद ठवकर व स्मिता गालफाडे यांनी तर आभारप्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी केले.