शिक्षकच प्रतिभावान व क्षमतावान पिढी घडवू शकतात~आ.ह.साळुंखे

0
6

वाशीम,दि.२६ ः शिक्षकांमध्ये विविध गुण आहेत. त्यांना वाव मिळाला पाहिजे, त्यांच्यामध्ये कलेचा आस्वाद घेण्याची प्रतिभा असली पाहिजे, तरच ते प्रतिभावान व क्षमतावान असलेली दुसरी पिढी निर्माण करू शकतील. ज्या शिक्षकाला नोकरीसोबत सर्वकाही मिळाले आहे. त्यांनी समाजाकडे मागे वळून पाहिले पाहिजे, आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
कारंजा येथील माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील साहित्यनगरी विद्याभारती महाविद्यालय परिसरात शिक्षक साहित्य संघाच्या वतीने ७ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षक साहित्य सम्मेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे सातारा यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शोभा रोकडे ह्या होत्या, तर स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत हे होते. प्रमुख अतिथी म्हणून संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सोनखासकर, सचिव राजेश सातव, अमरावती येथील बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बोजहारे, प्रा. डॉ. श्रीकांत तिडके मूर्तीजापूर, शैलेश काळे अमरावती, प्रा. हेमंत खडके, प्राचार्य डॉ. सुदाम गवई, विलास मराठे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.