महिला जागतिक दिनानिमित्त ८३१८महिला, मुली साकारणार” बेटी बचाओ, बेटी पढाओ”

0
9
आकाश पडघन
वाशिम, दि ०८:-जागतिक महिला दिनानिमित्त दि. ८ मार्च २०१८ रोजी सकाळी ७ वाजता वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर ८,३१८ महिला व मुली एकत्र येऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारणार आहेत. या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. या उपक्रमाची आज रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये महिला, मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
जागतिक महिला दिनानिमित्त महिला, मुलींनी एकत्र येऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’चा लोगो साकारून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा संदेश द्यावा, याकरिता जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम आयोजित केला आहे. यामाध्यमातून महिला, मुलींना अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध महिला संघटना, महिला बचत गट, गृहिणी यांनी या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे
‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’चा चमू करणार निरीक्षण
 ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’च्या लोगोच्या निरीक्षणासाठी विश्व विक्रमांची नोंद घेणाऱ्या ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’चा चमू उपस्थित राहणार आहे. निरीक्षणानंतर या उपक्रमाची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये घेतली जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला, मुली यांनी दि. ८ मार्च २०१८ रोजी सकाळी ७ वाजता पोलीस कवायत मैदान येथे उपस्थित राहून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.