पोलिस उपनिरीक्षक दुबे यांची तडकाफडकीबदली

0
14

चंद्रपूर,दि.23ः- वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मनिष दुबे यांची नुकतीच चंद्रपूर येथे तडका फडकी बदली करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला शासकीय रुग्णवाहीके संदर्भात जाब विचारणार्‍या पत्रकार मनिष भुसारी व सामाजिक कार्यकर्ते राहुल जानवे यांच्या विरुध्द कक्ष सेवक लक्ष्मीकांत टाले यांने दिलेल्या तक्रारीवरून एका चुकीच्या पध्दतीने गुन्हा दाखल केला होता. त्या पार्श्‍वभूमिवर हे स्थानांतरण झाले अशी चर्चा आहे.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात ९ मार्चरोजी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णवाहीका सेवा १0८ चा लाभ न देता त्यांना खाजगी रुग्णवाहीकेने रेफर करण्यात आले होते. या संदर्भात मनसेचे स्थानिक नेते तथा सामाजिककार्यकर्ते राहुल जानवे आणि वृत्तपत्र प्रतिनिधी मनिष भुसारी यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला होता. त्यांची वैद्यकीय अधिकारी अनिरुध्द धकाते यांच्याशी चर्चाचालू असतांना कक्ष सेवक लक्ष्मकांत टाले याने स्वत: चर्चेत सहभागी होत वाद वाढवून घेतला. त्यानंतर भुसारी आणि जानवे यांनी कोणत्याही प्रकारची धक्काबुकी किंवा मारहाण केली नसताना टाले यांनी पोलिस स्टेशन गाठून जानवे व भुसारी विरोधात तक्रार दिली. या तक्रारीनंतर कर्तव्यावरील पोलिस उपनिरीक्षक मनिष दुबे यांनी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी व वैद्यकीय अधिकारीयांची बयाण नोंदविली. आणि त्यानंतर भुसारी व जानवे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
भुसारी व जानवे यांच्यावर गुन्हां दाखल होताच राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली.अनेकांनी रूग्णालय प्रशासनातील सावळागोंधळालाच यासाठी जबाबदार ठरवून खाजगी रुग्णवाहीका धारकांना लाभ पोहचविण्याकरीता रचलेले हे षड्यंत्र असल्याचा आरोप या निमित्ताने झाला. यामुळे आपले पितळ उघडेपडेल या भीतीने रुग्णालय प्रशासनाने भुसारी व जानवे यांच्याकडून धक्काबुक्की किंवा मारहाण झाली नाही ,परंतु पोलिसांनी तसे बयाणात नोंदवून दोघांवरही गुन्हे दाखल केले असावे अशी प्रतिक्रिया देऊन गुन्हे दाखल होण्याचे खापर पोलिसांवर फोडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान,महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी चंद्रपूर येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले आहे. परिणामी याची दखल घेवून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस उपनिरीक्षक मनिष दुबे यांना स्थानांतरीत ठिकाणी रूजू होण्यासाठी वरोरा पोलिस स्टेशनमधून त्वरीत कार्यमुक्तकरण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे मंगळवारी रात्री मनिष दुबे यांना वरोरा येथून कार्यमुक्त करण्यात आले.