आरोग्यसेवा ऑक्सिजनवर ठेवून व्यापारी गाळय़ांचे बांधकाम!

0
10

आमगाव,दि.१ः राज्यातील सीमा परिसरातील उत्तम आरोग्य सेवा देण्याचा मान बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळत असताना रुग्णालयातील मूलभूत गरजांना ऑक्सीजनवर घालून या परिसरात राजकीय पुढारी व अधिकार्‍यांनी व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरू करून रुग्ण सेवा बाधित करण्याचे कारस्थान सुरू केल्याचा संशय येथील नागरिक करू लागले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर संबंधित पुढारी व अधिकार्‍यांकडून स्वत:चे खिशे गरम करण्याकरिता आरोग्य सेवेला बाधित करून व्यापारी गाळे निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शहरवासीयांनी केली असून २ हजार नागरिकांच्या स्वक्षर्‍या असलेले निवेदन राज्य शासनाला पाठविण्यात आले आहे.
शहराच्या मुख्य भागी नगर परिषद परिक्षेत्रात बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णसेवा देण्यासाठी कर्तव्यावर आहे. राज्य सीमेजवळ असल्याने तसेच शहराच्या मध्यभागात असल्याने तालुक्यासह राज्य सिमेवरील छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यातील रुग्णांची येथे नेहमीच वर्दळ असते. परंतु या रुग्णालय परिसरात राजकीय पुढारी व जिल्हा परिषद प्रशासनाने स्थानिक रुग्ण कल्याण समिती व नगर पंचायत प्रशासनाला अंधारात ठेवत व्यापारी गाळ्यांचा घोळ पुढे केला आहे. या परिसरात पूर्वीच अकरा गाळे बांधकाम करून जिल्हा परिषदने रुग्णसेवा चव्हाट्यावर आणली. या गाळ्यांचे प्रकरण आताही न्यायप्रविष्ठ आहे.
परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने स्थानिक रुग्ण कल्याण समिती व प्रशासक नगर परिषद, नगर रचनाकार विभाग यांना डावलून याच परिसरात रुग्णसेवांना धाब्यावर बसवून पुन्हा ३0 लक्ष रुपयांच्या गाळे बांधकाम प्रस्तावाला मंजुरी देऊन यात रुग्ण सेवा परिसराला बाधीत करण्याचे कार्य प्रारंभ केले आहे. व्यापारी गाळे निर्मितीने रुग्णालयासाठी जागाच उपलब्ध राहणार नसून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पुढे येत आहे.
प्राथमिक आरोग्य बनगाव प्राथमिक रुग्णालय असले तरी या ठिकाणी असलेल्या आवश्यक सेवेमुढे आरोग्य सेवा नावाजलेली आहे. रूग्णालयात दररोज तीनशे रुग्णांचे प्राथमिक उपचार करून औषधोपचार करण्यात येतात. वर्षाला तीनशे महिलांची प्रसूती, अडीचशेपर्यंत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, साथीचे रोग, मृत्यूदर कमी करणे, कुपोषण, महिला बालविकास व दुर्धर आजारांविषयी लोकअभियान यासारख्या महत्त्वपूर्ण सेवा देण्यात येतात.
परंतु या सेवांना बाधित करून या रुग्णालय परिसरात व्यापारी गाळे निर्माण करून आर्थिक लाभ उचलण्याचा डाव नागरिकांच्या आरोग्य सेवेवर येवून पडला आहे. या संदर्भात बांधकाम विभागातील प्रशासन व पदाधिकारी यांची लेखी तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली असून हा बांधकाम रद्द करून दोषींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षरीने शासनाला पाठविण्यात आले आहे