रेशन कार्डासाठी ग्रा.पं.सदस्याने पैसे मागितल्याचा आरोप

0
10

चंद्रपूर,दि.04ः-जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा ग्राम पंचायतचे सदस्य अभय मुनोत यांनी नवीन रेशन कार्ड बनवून देण्यासाठी येथील जोगी कॉलनीतील तीन महिलांकडून गतवर्षी प्रत्येकी २ हजार रु. मागितल्याचा आरोप करण्यात आला. एक वर्ष लोटूनही कार्ड न मिळाल्याने व फसगत झाल्याचे ग्राह्य धरुन शेवटी सदर महिलांनी २१ मार्च रोजी गडचांदुर पोलिस स्टेशन येथे लेखी तक्रार देऊन मुनोद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अम्रपाली रामदास ढवळे,अनुसया ठाकरे तथा सुनिता यादव अशा तक्रारदार महिलांची नावे असून १0 ते १२ दिवस लोटूनही कोणताच गुन्हा दाखल करण्यात न आल्याने ३१ मार्च रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्याकडे मुनोतवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलांनी केली आहे.अभय मुनोत यांच्यावर या अगोदरही गडचांदुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून पोलिस प्रशासन आता काय भूमिका घेतात. याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान मुनोद यांनी पवनदीप यादव, पुरूषोत्तम आस्वले व चंद्रप्रकाश बोरकर हे माझे राजकीय विरोधी असून या तिघांनी मला गोत्यात आणण्यासाठी व्यवस्थित कट रचला आहे. तक्रारदार महिलापैकी अनुसयाबाई ठाकूर ही पवनदीप यादवच्या घरी घरकाम करते. तर आम्रपाली ढवळे हिला मी कधीच बघितले सुद्धा नाही. २0१५ मध्ये नोकरी ग्रा.पं.ची निवडणुकीच्या वेळी मी सर्वांसोबत प्रचारासाठी रेल्वे कॉलनीत गेलो होतो. तेव्हापासून आजपयर्ंत मी त्या ठिकाणी फिरकलो सुद्धा नाही. तर त्याचे रेशन कार्ड बनविण्यासाठी पैसे घेतल्याचा प्रश्नच उदभवत नाही. काही दिवसापुर्वी यादव यांच्या भुरकुंडा येथील शेतात राजुरा पोलिसांनी छापा मारुन मोठा हरयाणवी दारुसाठा पकडला होता. ती कारवाईला मला जबाबदार धरून पवनदीपच्या भावाने मला शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी  दिल्याचा आरोप केला आहे.