गडचिरोलीत मे महिन्यात ओबीसी जनगणना अधिवेशन

0
13

गडचिरोली,दि.09: केंद्र शासनाने २०११ मध्ये जनगणना जाहीर केली आहे. मात्र, शासनाकडून अद्यापपर्यंत सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. केंद्र सरकार कडून जनगणनेची आकडेवारी देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आक्रमक भूमिका घेण्यासाठी गडचिरोली येथे मे महिन्यात ओबीसी जनगणना अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे अध्यक्ष रुचीत वांढरे यांनी दिली आहे.

सन १९३१ नंतर भारतामध्ये इतर मागासवर्गीयांची जातनिहाय जनगणना केलेली नाही. अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व अल्पसंख्यांक प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना केली जाते. जनगणनेतील या प्रवर्गातील लोकसंख्येच्या आधारे या मागास जातींसाठी राज्य आणि केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली जाते. जनगणनेच्या आधारेच पंचवार्षिक योजनांचे नियोजन केले जाते. मात्र, सन १९३१ पासून इतर मागासप्रवर्गाची स्वतंत्र जनगणना केली नसल्यामुळे देशातील ५४ टक्क्याहून अधिक असलेल्या या मागास प्रवर्गासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जात नाही. त्यामुळे हा समाज मागासलेला राहिला आहे जातनिहाय जनगणनेमुळे इतर मागास प्रवर्गाच्या लोकसंख्येसोबतच आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीची माहिती उपलब्ध होणार आहे. स्वतंत्र जनगणनेमुळे या प्रवर्गातील ग्रामीण व नागरी भागातील नागरिकांना लोकसंख्येच्या आधारे घरकुले, स्वयंरोजगार, शैक्षणिक लाभ, पिण्याचे पाणी, वीज इत्यादी मुलभूत नागरी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देता येणार आहे. भारताची झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या बघता निश्चितच ओबीसी समुहाची लोकसंख्याही त्याच वेगाने वाढत आहे. त्यामुळे ओबीसींची एकूण अंदाजे ६० ते ६७ टक्के निश्चित लोकसंख्या गृहीत धरल्यास व त्यांची जातीनिहाय संख्या कळल्यास उदा. देशाच्या एकूण बजेट मध्ये १०० रुपयापैकी सरासरी ६३ रुपयाची तरतूद करावी लागेल व केंद्रात, राज्यात व पंचायत संस्थामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण प्राप्त होईल,ओबीसीसाठी शैक्षणिक व सरकारी नोकऱ्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळेल , राज्य मागास आयोग व राष्ट्रीय मागास आयोगाना संविधानिक दर्जा मिळून स्वतंत्र न्यायालयाचे अधिकार प्राप्त होतील, विशिष्ट विकासानंतर समानतेची पातळी गाठण्यास स्वत:वर बंधने लादण्याची मानसिकता निर्माण होईल. त्यामुळे क्रिमी लेयर ही संकल्पना बाद होईल , खाजगी क्षेत्रात उद्योग उभे करण्यासाठी सरकारकडून आर्थिक पाठबळ मागता येईल. विशेष म्हणजे भारतीय समाजातील कोणत्या जाती ह्या सक्षम व अक्षम आहेत हे जाणून घेण्यासाठी जनगणनेची फार गरज आहे अशे मत राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे रुचीत वांढरे यांनी व्यक्त केले.

तसेच गडचिरोली शहरासह जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी अक्षय नैताम यांचे गडचिरोली शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तर किरण कटरे यांची जिल्हा कार्याध्यक्ष , आदित्य डोईजड यांची सोसल मीडिया प्रमुख तथा प्रसिद्धी प्रमुख , उद्धव बांगरे तालुका मुख्य मार्गदर्शक , चंचल रोहणकर तालुका मुख्य प्रचारक तर देविदास सोनूले यांची तालुका सदस्य तथा मुडझा शाखा प्रमुख मनुन निवळ करण्यात आली. सदर बैठकीस हर्षद भांडेकर , बादल गडपायले , पंकज खोबरे , राहुल भांडेकर , शुभम भांडेकर , विक्की मोगरे , मंगेश खोबे , आकाश भोयर, दिवाकर जेंघठे , परमानंद पुनमवार , चेतन शेंडे बहुसंख्यने युवक उपस्थित होते.