बाघ इटियाडोह विभागामूळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

0
23

गोंदिया,दि.14 :गोंदिया शहरासह जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना बाघ इटिया़डोह विभागाच्या चुकीच्या व भष्ट्राचारीवृत्तीचा फटका कालवा फुटल्याने बसला आहे. आंभोरा गावाजवळ कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याने पाणीटंचाईत वाढ झाली आहे. शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय १० एप्रिलला घेतला. त्यानंतर ११ एप्रिलला पुजारीटोलाचे पाणी सोडण्यात आले. हे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार होते. बाघ इटियाडोह पाटबंधारे प्रकल्प विभागातंर्गत येत असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आणि सिंचन विभागाच न झालेल्या समन्वयचा फटका आणि बाघ इटियाडोहचे कार्य.अभियंत्यापासून सर्वच अपडाऊन मध्ये व्यस्त राहत असल्याने त्यांनी केलेले दुर्लक्ष पाणी न पोचण्यास जबाबदार ठरले आहे.

कालव्यात पाणी सोडण्यापूवी कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची चाचपणी सिंचन विभागाने केली नाही. दरम्यान पुजारीटोला धरणातून २५० क्यूसेक पाणी सोडल्यानंतर हे पाणी सालेकसा तालुक्यातील आंभोºयाजवळ पोहचले तर यापासूनच काही अंतरावर असलेल्या आसोलीजवळ पाणी पोहचल्यानंतर कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे लाखो लीटर पाणी शेतांमध्ये वाहून गेले. परिणामी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत गुरूवारी (दि.१२) पाणीच पोहचले नाही. त्यामुळे गोंदिया शहराच्या पाणी टंचाईच्या समस्येत आणखी भर पडली. प्रकल्पाचे पाणी सोडण्यापूर्वी या विभागाने योग्य नियोजन केले असते तर लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला नसता असे बोलले जात आहे. आंभोरा आणि आसोलीजवळ कालव्याला मोठे भगदाड पडले असून त्याची दुरूस्ती करण्यासाठी किमान तीन चार दिवसांचा कालावधी लागू शकतो.
दोन महिन्यापूर्वीच भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणी टंचाईची शक्यता वर्तविली होती. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला होता. तेव्हाच प्रशासन उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र जेव्हा पाणी टंचाईची समस्या गंभीर होईल तेव्हाच उपाय योजना करु असा आत्मविश्वास जिल्हा प्रशासन आणि मजीप्राच्या अधिकाºयांनी बाळगला. त्यामुळे शहरवासीयांना आता पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.