अ‍ॅड.विरेंद्र जायस्वाल भाजपकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार

0
5

गोंदिया,दि.02: भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव अ‍ॅड. विरेंद्र जायस्वाल यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीकरिता पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. अ‍ॅड. जायस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले की, माजी खासदार नाना पटोले यांनी आपल्या कार्यकाळात कुठलेही जनसामान्यांच्या हिताचे कार्य न करता प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व भाजप विरुद्ध गरड ओकण्याचे काम केले. त्यांनी कधीही पक्षाला समजून घेतले नाही. आणि सरकारी योजनांचा प्रचार-प्रसार केला नाही. आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जनहितकारी योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी २२ फेबु्रवारीपासून १०० दिवस १०० गाव या अभियानांतर्गत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात योजनांच्या प्रचार-प्रसाराचे काम सुरु केलेत.

योजनेचा प्रचार-प्रसार ६५ व्या दिवसापर्यंत पोहोचलेलाच असतानाच निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने यात्रा सध्या स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारे यात्रा करुन गावखेड्यापर्यंत जाण्याचे काम आपल्या व्यतिरिक्त कुणीच केले नाही. विद्यमान व माजी आमदार, खासदारांनीही अशा पुढाकार घेतलेला नाही. पक्षासाठी आपण तळमळीने काम करीत आहोत. आणि निष्ठावंत असल्याने पक्षाने नाना पटोले उत्तर देण्याकरिता आपल्याला पोट निवङणुकीत उमेदवारी दयावी अशी मागणी केली आहे. गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक  इंगळे यांच्यासह इतर नेत्यांनीही जायस्वाल यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. अ‍ॅड. जायस्वाल यांनी सांगितले की, आपणास उमेदवारी मिळाल्यास पत्रकार आणि वकील क्षेत्रातील एका व्यक्तिला प्रतिनिधीत्व मिळेल सोबतच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात असलेल्या सर्ववर्गीय कलार समाजाला एक न्याय मिळेल. त्यामुळे पक्षाने आपला विचार करावा, असे सांगितले.