नक्षल बंदला झुगारून नागरिकांनी उभारले स्मारक

0
8

गडचिरोली,दि.12 : पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षली ठार होण्याच्या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला काही ठिकाणी गावकऱ्यांनी उघड विरोध केला. यावेळी त्यांनी लावलेले बॅनरही जाळले. एवढेच नाही तर २०१२ मध्ये नक्षल्यांकडून हत्या झालेल्या गजानन मडावी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गावात स्मारकही उभारण्यात आले.
नक्षलवाद्यांनी २०१२ साली जारावंडी येथील गजानन मडावी यांची निर्घृण हत्या केली होती. नक्षल बंदचे निमित्त साधत गावकऱ्यांनी मडावी यांच्या स्मरणार्थ व नक्षलवाद्यांच्या निषेधार्थ एकत्र येत गावात त्यांचे स्मारक उभे केले. गावकरी नक्षलवाद्यांच्या राक्षसीपणाला कंटाळले असून त्यांची आता आमच्याशी गाठ आहे, अशा आशयाची कविता एका आदिवासी युवकाने सादर करून आदिवासींच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी लावलेल्या बॅनर्सची वेगवेगळ्या ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्र येत होळी केली. बंद यशस्वी करण्यासाठी नक्षलवाद्यांनी रस्त्यावर तोडून टाकलेली झाडे गावकऱ्यांनी स्वत: बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत केली.
असा बंद आपल्यावर लादून नक्षली आमचा जगण्याचा हक्क हिरावून घेत आहेत. ते सूडाच्या भावनेतून आदिवासींवर अत्याचार करत असून त्यांचा नाहक खून करत आहेत. त्यांनी हे त्वरित थांबवावे अन्यथा आम्हा गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होईल, अशी प्रतिक्रि या गावकऱ्यांनी व्यक्त करून नक्षलवाद्यांविरोधात घोषणा दिल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले.दरम्यान धानोरा तालुक्यातील मुरूमगाव-सावरगाव मार्गावर नक्षल्यांनी आडवी टाकलेली झाडे उचलल्यानंतर रात्री ८ वाजता या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. शुक्रवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.