सूरतहून मागविलेल्या ‘ईव्हीएम’वर पटेलांचा आक्षेप-खा.पटेल

0
9

भंडारा,दि.12 : महाराष्ट्रात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध असतानाही भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक विभागाने गुजरात राज्यातील सुरत येथून मशिन पाठविले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आक्षेप घेऊन शुक्रवारला दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा.पटेल म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन तर विधानसभेची केवळ एक पोटनिवडणूक होत आहे. यासाठी महाराष्ट्रात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. असे असताना या पोटनिवडणुकीसाठी सुरत येथून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन पाठविण्यात आल्यामुळे संशयासाठी जागा निर्माण होत आहे. ही पोटनिवडणूक पारदर्शकपणे व्हावी यासाठी आणि निवडणुकीविषयी विश्वासार्हता निर्माण होण्यासाठी या मशिनची तपासणी होणे गरजेचे आहे.
कोणत्याही निवडणुकीसाठी जेवढ्या मशिन्सची गरज असते त्यापैकी १० टक्के मशिनची रॅण्डम पद्धतीने तपासणी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यामुळे या निर्देशांचे पालन होणे गरजेचे असून या पोटनिवडणुकीत या निर्देशांचे पालन होते का? असा प्रश्न खा. पटेल यांनी यावेळी उपस्थित केला.
उन्हाळा खूप तापू लागल्यामुळे प्रचारसभांसाठी वेळ वाढविण्यात यावा आणि रखरखत्या उन्हामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविण्याची शक्यता असल्यामुळे मतदानाची वेळसुद्धा वाढविण्यात यावी, अशी मागणीही खा. पटेल यांनी केली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादीचे धनंजय दलाल, स्वप्नील नशिने उपस्थित होते.