मनोहरभाई पटेल अँकेडमी करणार ‘स्वाईन फ्लू’वर जनजागृती

0
14

गोंदिया : स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रभावामुळे त्याला आळा घालण्यासाठी मनोहरभाई पटेल अँकेडमीतर्फे एक पाऊल पुढे टाकून स्वाईन फ्लूवर जनजागृती कार्यक्रम सुरू केला आहे. संशयित रुग्णांना नजीकच्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयात संपर्क साधण्यासाठी प्रवृत्त केले जात आहेत.
स्वाईन फ्लूच्या जनजागृतीसाठी मनोहरभाई पटेल अँकेडमीतर्फे जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, अध्यक्षस्थानी देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते, डॉ. घनशाम तुरकर, विनोद हरिणखेडे, डॉ. विद्यासागर मोहन, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू, नमाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश नासरे, डॉ. येलन, अशोक शहारे, चंद्रकांत खंडेलवाल, मोहन पटले, कुलदीप रिनाईत उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते यांनी स्वाईन फ्लूची माहिती देत या आजारावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. आजारावर लागणारी औषधी आमच्याकडे उपलब्ध असल्याचे सांगितले. स्वाईन फ्लूचे लक्षणे आढळताच रुग्णांनी नजीकच्या ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. डॉ. घनश्याम तुरकर यांनी आजाराला न घाबरता डॉक्टरचा सल्ला घेण्याचे आवाहन केले. काही लोक या आजाराच्या भितीमुळे माक्स व व्हेक्सिनचा काळाबाजार करतात. याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. डॉ. येलन यांनी या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला भेटी देण्याचे सांगत छोटाशा सर्दी, ताप व डायरियाला न घाबरता आपले हात वेळोवेळी धुण्याचे आवाहन केले. उष्ण तापमानामुळे या आजाराचे विषाणू नष्ट होतात अशीही माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद््घाटन जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी विद्यार्थ्यांना समाज जागृतीचे दूत असे संबोधून या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे विद्यार्थी वर्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात देवेंद्रनाथ चौबे यांनी मनोहरभाई पटेल अँकेडमीतर्फे करण्यात येणार्‍या कार्याची माहिती देत खा. प्रफुल्ल पटेल व अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या मार्गदर्शनात हे कार्य करण्यात येत आहे, असे सांगितले.
विनोद हरिणखेडे व अशोक शहारे यांनी आ. राजेंद्र जैन यांच्या सुचनेनुसार स्वाईन फ्लू जनजागृती कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. कार्यक्रमाला गोंदिया शहरातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अँकेडमीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.