रस्ता तयार न करताच बांधकाम विभागात निधीची उचल

0
9

आमगाव दि.१८-: रस्ता तयार न करताच काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीची उचल केल्याचा प्रकार आमगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. यात संबंधित बांधकाम विभागाचे अभियंत्याचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. हा सर्व प्रकार पंचायत समितीच्या बुधवारी (दि.१६) पार पडलेल्या सभेदरम्यान पुढे आली आहे.
शासनाच्या ३० जून २०१७ प्रमाणे तालुक्यात विविध कामांना मंजुरी देण्यात आली. शासनाने या प्रस्तावित कामांना निधी मंजुर केला. परंतु या प्रस्तावित कामांना कागदावर दाखवून येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील काही अभियंत्याच्या मदतीने कंत्राटदारांनी कामे न करताच निधीची उचल केल्याची बाब पंचायत समितीच्या सदस्यांनी उघडकीस आणली.
प्राप्त माहितीनुसार आमगाव तालुक्यातील जवरी ते बोथली या रस्त्यावर खडीकरण व रस्ता बांधकामाकरिता ३ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला. तर किडंगीपार स्मशानघाट रस्ता खडीकरण, माल्ही किडंगीपार, बनगाव इंद्रप्रस्थनगर मुरुम रस्ते निर्माण, तसेच नाली बांधकाम अशा अनेक कामांचे प्रत्यक्षात बांधकाम न करताच बांधकाम विभागातील एक अभियंता व काही कंत्राटदारांसोबत संगनमत करुन निधीची उचल केल्याची धक्कादायक बाब पंचायत समितीच्या सभेत उघडकीस आली. माजी प.स.उपसभापती ओमप्रकाश मटाले, विद्यमान सभापती बोरकर, उपसभापती जयप्रकाश शिवणकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आमगाव अंतर्गत शासनाच्या निधीअंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या अहवालांचे अवलोकन केले. मंजुर निधी अंतर्गत बांधकाम झाले किंवा नाही याची पाहणी केली. त्यात बांधकामाच झाले नसल्याची बाब पुढे आली. यासंदर्भात वारंवार संबंधित विभागाला विचारणा केली असता अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पदाधिकाऱ्यांची दिशाभूल केली. सभेत अभियंत्याने सदर कामे झाले नसल्याची कबुली दिली. यावर अभियंत्याविरुद्ध ठराव पारित करुन कार्यवाहीसाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.