सासरा परिसरात विहिरीत पडला बिबट

0
26

साकोली,दि.21 : तालुक्यातील सासरा येथील शेतशिवारतील विहिरीत बिबट पडल्याची घटना रविवारला उघडकीस आली. विहिरीत बिबट असल्याची माहिती गावात व परिसरात पसरताच लोकांनी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी हजारोंच्या संख्येत असलेल्या जनसमुदायाला घटनास्थळापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.शेतमालक प्रमोद संग्रामे, सरपंच शालीक खर्डेकर, माजी सरपंच योगराज गोटेफोडे, तंमुस अध्यक्ष तुकाराम गोटेफोडे, रोशन संग्रामे, सोनु संग्रामे यांनी सदर घटनेची माहिती वनविभाग कार्यालय व सानगडी येथील पोलीस चौकीला दिली.
घटनास्थळावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून क्षणाचाही विलंब न लावता पोलीस व वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले.प्रत्यक्षात परिस्थिती पाहता या घटनेची माहिती संबंधित विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात दिली. काही वेळेतच वनविभागाचे व पोलीस विभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.शनिवारच्या रात्री कुंजीलाल संग्रामे, रोशन संग्रामे, सोनु संग्रामे, अजय संग्रामे हे शेतकरी ऊसाला पाणी देण्याकरिता शेतावर गेले. यांच्यापैकी कुंजीलाल यांना बिबट दिसला. त्यांनी याची माहिती सहकाऱ्यांना दिली. ती वेळ साधारणत: रात्रीच्या ९ वाजताची होती.या शेतकºयांनी मोबाईलद्वारे घरी व मित्रांना सानगडी येथील वनविभागाला माहिती दिली. काही क्षणात वनविभागाचे कर्मचारी व गावातील शेकडो नागरीक शेताकडे आली. आजुबाजूला शोधताच दोन बिबट त्यांच्या दृष्टीस पडले. या वाघांनी माकडाची शिकार केली होती. ती शिकार खात असतांनीच लोकांचा आरडाओरड झाला. विहिरीच्या आजूबाजूच्या शेतात ऊसाचे पिक उभे आहे. लोकांच्या गलक्याने वाध पळत असतानीच एक वाघ विहिरीत पडला असावा ही बाब त्यावेळी कोणाच्याही लक्षात आली नाही.
शेतकरी सकाळी शेतात गेले. त्यांच्यासोबत अन्य मंडळी होती. सर्वत्र ऊस असल्याने इशारा करुन खात्री करत होते. त्यांना एक बिबट ऊसात आढळला. त्याला ते हाकलत होते. काही मंडळी विहिरीच्या दिशेने जात होती. त्यापैकी एकाने विहीरीत डोकावून पाहताच त्याना तिथे बिबट दिसला. ही माहिती सर्वत्र पसरली. बिबट्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.
घटनास्थळी वन परिक्षेत्राधिकारी आरती ऊके, आर. ओ. घोटे, तांडेकर, मेश्राम, सार्वे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पोलीस मेश्राम, गायधने यांनी सहकार्य केले.