आगीत दोन लाख रुपये जळाले

0
7

सालेकसा,दि.21 : शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्यासह रोख दोन लाख रुपये जळून राख झाल्याची घटना शनिवारी (दि.१९) रात्री ८ वाजताच्या सुमारास  तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे घडली. यामुळे चार लाख रुपयांच्या वर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथील शकुंतला राधेलाल शिवणकर यांच्या घराला शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे आग लागली. काहीच वेळात आगीने रौद्ररुप धारण केल्याने घरातील संपूर्ण साहित्यासह घरात असलेले दोन लाख रुपये आगीत जळून राख झाले. त्यामुुळे शिवणकर यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. आग लागली त्यावेळी शिवणकर यांच्या घरात कुणीही नव्हते. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. मोलमजुरी व भांडीकुंडी करुन आपला उदरनिर्वाह करणारी शकुंतला आपल्या दोन मुल व एका मुलीसोबत येथे राहात होते. मुलांना चांगले शिक्षण देता यावे, म्हणून प्रसंगी उधार उसणवारी करून संसाराचा गाडा चालवित आहे. मुलगी नागपूरला एका मोठ्या दवाखान्यात नर्सचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्यासाठी शकुंतलाने उसणवारीवर दोन लाख रुपये आणले होते. हे पैसे मुलीला देण्यासाठी ती रविवारी (दि.२०) नागपूरला जाणार होती. मात्र शनिवारी रात्रीच्या सुमारास घराला लागलेल्या आगीत दोन लाख रुपयांची रोख व सोन्या-चांदीचे दागिने जळून राख झाले. आगीमध्ये घरातील कपडे, अन्नधान्य, टीव्ही तसेच इतर साहित्य जळाल्याने ४ लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी बागडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. घर पक्के स्लॅबचे असल्याने आग बाहेर पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शकुंतला शिवणकर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शासनाने त्यांना अर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.