वाघासोबत झालेल्या झटपटीत छाव्याचा मृत्यू

0
26

नागपूर,दि.23- पश्चिम पेंच परिक्षेत्रातील कोलीतमारा बिट कक्ष क्रमांक 668 मध्ये 20 मे रोजी, दुपारी 5 वाजता एक वाघ छावा (मादी) मृतावस्थेत आढळून आली. या छाव्याची शिकार झाली नसून दुसऱ्या मोठ्या वाघाकडून मारल्या गेल्याची माहिती क्षेत्रसंचालक आर. एस. गोवेकर यांनी दिली आहे. मृत वाघाच्या मानेवर, नाकावर, पुढील पायावर खोल जखमा तसेच समोरच्या शरीराच्या बाजूच्या भागावर सुद्धा काही जखमा दिसून आल्या.

घटनास्थळापासून जवळच मोठ्या वाघाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा आढळल्या असून छाव्याचे (मादी) सर्व अवयव शाबुत आढळले आहेत. घटनास्थळी वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पंचे व्याघ्र प्रकल्प उपस्थित होते.मृत छाव्याचे शवविच्छेदन व अनुषंगिक कार्यवाही 21 मे रोजी करण्यात आली. शवविच्छेदनाच्या वेळी पंचनामा करताना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे वैभव सी. माथूर, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे निनू सोमराज, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. कडू अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व नागपूर यांचे कार्यालय, पशुधन विकास अधिकारी डॉ. के. एस. लोखंडे, डॉ. सी. जी. हगोने, वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया-मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी प्रफुल्ल भांबुरकर, ट्रॉझिट ट्रिटमेंट सेंटरचे डॉ. बिलाल अली हे उपस्थित होते.