बिरसा मुंडा यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी- पालकमंत्री बडोले

0
15

गोंदिया, दि.२२ : बिरसा मुंडा हे एकोणवीसाव्या शतकातील आदिवासींचे लोकनायक होते. तत्कालीन परिस्थितीत त्यांनी समाजाला न्याय देण्यासाठी चळवळ उभारली म्हणून ते क्रांतीवीर ठरले. त्यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील मुरदोली येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (ता.२२) पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार नाना पटोले, भाजपा उपाध्यक्ष दिलीप चौधरी, मुरदोलीचे सरपंच शशेंद्र भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा‘ या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्रिसूत्री मुलमंत्राचा अवलंब करुन समाजाने आपली प्रगती साधण्याची गरज आहे. आदिवासींचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टीने दारिद्रय दूर झाले पाहिजे. यासाठी नागपूर व पुणे येथे स्पर्धा परीक्षाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत आहे. समाजात शिक्षणाच्या संदर्भात जो अंधार होता तो आता दूर व्हायला लागला आहे. समाज खरंच आता प्रबोधनाच्या दिशेला पुढे जायला लागला आहे. आदिवासींच्या विकासासाठी शासन ज्या काही योजना राबवित आहे त्या योजनांचा लाभ घेवून आपली उत्तरोत्तर प्रगती करावी असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाढीव अनुदानाबाबत तसेच नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे वीज भारनियमन बंद करण्याबाबत शासनस्तरावर नक्कीच प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
खासदार नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकारच्या योजना जिल्ह्यात राबवून आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे, त्यासाठी अन्यायाच्या विरोधात लढण्याची आपल्यात शक्ती असली पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आदिवासी बांधवांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी नॅशलन पीपल्स फेडरेशनचे दुर्गाप्रसाद कोकोडे, सामाजिक कार्यकर्ते पवन टेकाम, जगदिश खंडाते, डॉ.पटले, श्री.सयाम, भरत मडावी यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे विधीवत अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी शालेय विद्यार्थीनींनी आदिवासी नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर मेश्राम यांनी केले. संचालन योगेश इळपाचे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रविंद्र उईके यांनी मानले. कार्यक्रमास सडक अर्जुनी तालुका परिसरातील आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.