विमानतळांवर वढेरांचीही होणार तपासणी

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांचीही यापुढे विमानतळांवर तपासणी करण्यात येणार आहे.
निवडक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींप्रमाणे वढेरा यांनाही विमानतळावर तपासणी करण्यातून वगळण्यात आले होते. मात्र, आता त्यांचे नाव संबंधित यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात गोवा विमानतळाने सर्वात आधी वढेरा यांचे नाव त्या यादीतून वगळले आहे. हा निर्णय घेण्यामागे प्रवाशांचा संताप हे कारण असल्याचे विमानतळ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
वढेरा यांचे नाव तपासणी न होणार्‍या व्यक्तींच्या यादीत का आहे, हा प्रश्‍न आम्हाला अनेक प्रवासी वारंवार विचारत होते. त्यामुळे, ते नाव यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्याविषयी अनेकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती गोवा विमानतळावरील एका सुरक्षा अधिकार्‍याने दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्रालयाकडून अद्याप अधिकृत निर्देश देण्यात आलेले नाहीत.
गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, नागरी विमान वाहतूक सुरक्षा संस्था अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या नावांची ही यादी तयार करते. राष्ट्रपती आणि विशेष सुरक्षा असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची विमानतळावर तपासणी करण्यात येत नाही. अशा एकूण ३० जणांच्या नावांचा यादीत समावेश आहे. वादग्रस्त उद्योजक रॉबर्ट वढेरा यांच्या पत्नी प्रियंका यांनी गेल्या वर्षी ३० मे रोजी रॉबर्ट यांचे नाव यादीतून वगळण्याची विनंती विशेष सुरक्षा दलाच्या प्रमुखांना पत्राद्वारे केली होती.