नक्षलग्रस्त भरनोलीत ७४ टक्के मतदान,बोंडगावदेवीत नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क 

0
10
गोंदिया,दि.२८ : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज २८ मे रोजी मतदान झाले. या लोकसभा मतदारसंघातील नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशील व दुर्गम भागात असलेल्या भरनोली या अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील गावात ७४ टक्के मतदान झाले.  अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील बोडंगावदेवी येथील राकेश साखरे या वराने वधुमंडपी वराड घेऊन जाण्याआदी मतदानाचा हक्क बजावला.
रखरखत्या उन्हात भरनोली येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदार मतदान करतांना उत्साहीत दिसत होते. विशेष म्हणजे हा भाग नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्यामुळे मतदानाची वेळ अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत होती. भरनोली येथील ३०५ क्रमांकाच्या एकमेव मतदान केंद्रावर ५३७ पुरुष आणि ५०६ स्त्रिया अशा एकूण १०४३ मतदारांचा समावेश होता. त्यापैकी दुपारी ३ वाजतापर्यंत ३८४ पुरुष आणि ३८३ स्त्री अशा एकूण ७६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७४ टक्के इतकी आहे.
 भरनोली येथील मतदान केंद्रावर भरनोली, बल्लीटोला, शिवरामटोला, बोअरटोला व तिरखुरी या गावातील मतदारांनी रखरखत्या उन्हात आडवळणावर असलेल्या आपल्या गावावरुन येऊन मतदान केले. विशेष म्हणजे भरनोली येथील श्रीमती भागरथा कराडे (वय ९० वर्ष) व श्रीमती जनको कुमरे (वय ८५ वर्ष) यांनी देखील आपल्या नातवंडांचा आधार घेवून मतदान केंद्रावर येऊन मतदान केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या भरनोली येथील मतदान केंद्रावर वरील ५ नक्षलग्रस्त गावातील मतदारांनी येवून व मतदान केंद्रावरील रांगेत उभे राहून मोठ्या प्रमाणात मतदान केले. यावरुन या भागातील लोक नक्षलवादाला कंटाळले असून त्यांचा लोकशाहीवरच विश्वास असल्याचे केलेल्या मतदानावरुन स्पष्ट झाले आहे. देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या नेतृत्वात मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.