नक्षलवाद्यांनी जाळले सायगाव डेपोतील लाकडे

0
12

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.28 :  तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत राजोली येथील वन विभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी शुक्रवारी (दि.२५) रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास आग लावल्याने यात चार लाखांचा लाकूड जळून खाक झाला. ही घटना शनिवारी (दि.२६) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.सायगाव येथील वनविभागाच्या डेपोला आग लावून ४ लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले. शनिवारच्या पहाटे १५ नक्षलवाद्यांनी या डेपोला आग लावली. यासंदर्भात केशोरी पोलिसांनी नक्षलवाद्यांवर भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ४३५, सहकलम १६, २०, २३ बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा कलम १३५, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
राजोलीपासून ३ किमी अंतरावर वन विभागाच्या वनपरिक्षेत्र क्रमांक ३३० मध्ये लाकूड डेपो आहे. या डेपोमध्ये अंदाजे ३० घनमीटर इमारत बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ६८ घनमीटर लाकडाचा साठा होता. हा सर्व लाकूड नक्षलवाद्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जाळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नक्षल्यांनी लावलेल्या आगीमध्ये या डेपोमधील संपूर्ण लाकूड जळाल्याने वनविभागाचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी दुपारच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी डेपो परिसरात गेले असता हा प्रकार त्यांच्या उघडकीस आला. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केशोरी पोलीस स्टेशनला दिली. शुक्रवारी (दि.२५) राजोली भरनोली परिसरात नक्षली पत्रके व बॅनर आढळले होते. या पत्रकाच्या माध्यमातून नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर एकाच दिवसानंतर लाकूड डेपोला आग लावल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.