बँकांनी मोठ्या प्रमाणात महिलांना कर्ज उपलब्ध करुन दयावे- पालकमंत्री बडोले

0
11

गोंदिया,दि.९ : आज महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. या संघटनात माविमचा मोलाचा वाटा आहे. माविममुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असून त्या उद्योजक बनत आहेत. आज महिलांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनविण्यासाठी बँकांनी आता मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठया प्रमाणात कर्ज उपलब्ध करुन दयावे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
८ जुन रोजी सडक-अर्जुनी येथील तेजस्विनी लॉनमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती गोंदिया, नियोजन विभाग आणि आधार लोकसंचालित साधन केंद्र सडक-अर्जुनी यांच्या संयुक्त वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे उद्धाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सडक-अर्जुनी पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती उपसभापती राजेश कठाणे, जि.प. सदस्य शीला चव्हाण, पंचायत समिती सदस्य, कविता रंगारी, मंजूर डोंगरवार, माजी पंचायत समिती सभापती पद्मा परतेकी, तहसिलदार विठ्ठल परळीकर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक श्री पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बी. एस. शिवणकर, बँक ऑफ इंडियाचे वित्तीय समावेशक रविंद्र पहिरे, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, लक्ष्मीकांत धनगाये, शामराव शिवणकर, जिजाबाई पाथोडे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुद्रा योजनेअतर्गत शिशू गटात कर्ज मंजूर झालेल्या अमीता अग्रवाल, सविता कटरे, मीनाक्षी बोरकर, सुशिला लाडे यांचेसह १० जणांना कर्जप्रकरणाचे मंजूरी पत्र देण्यात आले. डोंगरगाव येथील यशस्वी महिला बचत गट, सडक – अर्जुनी येथील एकता बचत गट, कन्हारपायली येथील यशोधरा बचत गट तसेच संत गाडगेबाबा ग्रामसंस्था पळसगाव, निर्मल ग्रामसंस्था उशिखेडा, राणीलक्ष्मी ग्रामसंस्था बक्की यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रोजेक्ट आत्मसन्मान योजनेअंतर्गत वैशाली डोये, कविता शेन्डे,मीना रहांगडाले, नीता पटले, हेमा नंदेश्वर यांचेसह २५ बचतगटातील महिलांना फुलवात तयार करणाऱ्या मशीनचे वाटप पालकमंत्री बडोले यांनी केले. वनश्री बचतगटातील सभासद रेखा कटरे यांचा मुलगा योगेश कटरे हा इयत्ता १२ वीमध्ये ९३ टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे सडक-अर्जुनी येथील शाखा व्यवस्थापक श्री पंचबुध्दे यांनी मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना कर्ज दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.संचालन शालीनी साखरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार व्यवस्थापक पालींद्रा अंबादे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पना नंदेश्वर, दुर्गा नंदेश्वर, माधूरी भेंडारकर वर्षा हाडगे, सुकेशनी बडोले, वैशाली डोये, सरीता चिंधालोरे, मंजूषा तरोणे, अंजीरा चौधरी, लता कळपते, ममता नेवारे यांचेसह आधार लोकसंचालित साधन केंद्राच्या सर्व पदाधिकारी व प्रेरकांनी सहकार्य केले.