पोलिस दलातर्फे ‘त्या’ पाच वीरांचा गौरव

0
10

गडचिरोली,दि.10(अशोक दुर्गम)ः-महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा गावातील ५ मुलांनी १६ मे २0१८ रोजी एव्हरेस्ट शिखर सर केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यात गेले होते. या पाचही जणांचा सन्मान सोहळा आज ९ जून रोजी गडचिरोली पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) डॉ. महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) डॉ. हरि बालाजी, अप्पर पोलिस अधीक्षक (नक्षलसेल) महेंद्र पंडीत यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एव्हरेस्टवीर मनिषा धुर्वे हिच्या हस्ते वीर क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या ११८ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर एव्हरेस्ट सर करणार्‍या मनिषा धुर्वे, उमाकांत मडावी, कविदास काठमोडे, प्रमेश आडे, विकास सोयाम त्याचबरोबर एव्हरेस्ट चढाई करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणार्‍या बिमला नेगी, विस्तार प्रकल्प अधिकारी सुधाकर काकडे, शामराव काकडे, मनिषा धुर्वे यांचे वडिल धर्मा धुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भावना व्यक्त करताना या एव्हरेस्ट विरांनी आपल्या भारताचा झेंडा जेव्हा एव्हरेस्टवर फडकविला, तेव्हा आपले जीवन सार्थकी झाल्याचे सांगितले. प्रशिक्षक नेगी यांनी एव्हरेस्टवर चढाई करताना राबविलेल्या ‘मिशन शौर्य-२0१८’ बाबत विद्यार्थ्यांना निवडीपासून ते एव्हरेस्ट शिखर सर करण्यापर्यंतचा प्रवास सर्वांसमोर मांडला. यामध्ये विद्यार्थ्यांना काय अडचणी आल्या व त्यांनी त्यावर कशी मात केली हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संपूर्ण टिमचे अभिनंदन करीत भविष्यात देखील त्यांच्याकडून अशाचप्रकारे कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली. गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसमोर हा एक आदर्श असून त्यांनीदेखील पुढे येवून गडचिरोलीचे नाव देशाच्या कानाकोपर्‍यात न्यावे, अशी भावना उपस्थित विद्यार्थी व पोलिसांच्या समोर व्यक्त केली. यावेळी उपस्थितांना नेगी यांनी ‘मिशन शौर्य-२0१८’ बाबतचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ दाखविला.