कोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सहकार्यामुळेच: डॉ. देवराव होळी

0
20

गडचिरोली,दि.११(अशोक दुर्गम): बेरोजगारांना रोजगार देणारा सुरजागड लोह प्रकल्प जिल्ह्यातच व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. यासाठी अनेकांनी विविध पद्धतीने आंदोलने केल्यानंतर चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे प्रकल्प उभारण्यात येत आहे. यात कोनसरी येथील नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आपली जमीन उपलब्ध करून दिल्यामुळेच हा प्रकल्प येथे होऊ शकणार आहे. हा प्रकल्प म्हणजे सर्वांच्या सहकार्यामुळे उभा राहिलेला प्रकल्प आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे आ.डॉ. देवराव होळी, जनहितवादी संघटनेचे नेते सुरेश बारसागडे व दीक्षा झाडे यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी आ.डॉ.होळी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, माजी जि.प. सदस्य धर्मप्रकाश कुकूडकर, भाजपा तालुका अध्यक्ष श्री.भांडेकर, मनमोहन बंडावार आदी मान्यवर उपस्थित होते.