यवतमाळात २८ जून रोजी ‘कर्जमाफीचा पंचनामा’ आंदोलन

0
7

यवतमाळ, दि.१८- शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेला वर्षभराचा कालावधी लोटूनही राज्यातील हजारो शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने हे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाच्या या फसव्या कर्जमाफीचा पंचनामा जिल्ह्यातील शेतकरी करणार आहेत. यासाठी २८ जून रोजी येथील तिरंगा चौकात या फसव्या ‘कर्जमाफीचा पंचनामा’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.पत्रपरिषदेला सचिन नाईक, मनीष पाटील, मिलिंद धुर्वे यांची उपस्थिती होती.

कर्जमाफी करण्याच्या घोषणेला वर्ष उलटूनही अद्याप अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळालेला नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी २८ जून रोजी यवतमाळ येथील तिरंगा चौकात या फसव्या ‘कर्जमाफीचा पंचनामा’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी तसेच माजी खासदार व काँग्रेस नेते नाना पटोले करणार आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात रविकांत तुपकरी, गजानन अहमदाबादकर हेही सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी राज्यभरात केलेल्या आंदोलनानंतर सरकारला शेवटी कर्जमाफी जाहीर करावी लागली. मात्र, या घोषणेस वर्षभराचा कालावधी लोटूनही हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूकच झाली असून आर्थिक अडचणीत आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तरीही शासनाने याची दखल घेतली नाही. शासनाच्या सर्व लबाडीचा पंचनामा या आंदोलनादरम्यान करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमाफी द्यावी, बोंडअळीच्या नुकसानाबाबत सभागृहात जाहीर केलेली मदत एकाच टप्प्यात शेतकऱ्यांना द्यावी, नोंदणी केलेल्या तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांना त्याचे चुकारे द्यावेत, पीकविमा वैयक्तिक स्तरावर सुरू करावा, यासह विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात येतील, असेही देवानंद पवार यांनी सांगितले.