खांबाडा-मुस्का मार्गावरवरील पूल धोकादायक

0
13

गडचिरोली,दि. २७ : गेल्या अनेक वर्षापासून मोडकळीस आलेला धानोरा तालुक्यातील खांबाडा-मुस्का मार्गावर असलेल्या नदीवरील पूल नागरिकांसाठी धोकादायक ठरला आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ राहत असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, पावसाळ्यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खांबाडा-मुस्का या मार्गावर खोब्रागडी नदी आहे. पुलावरुन दिवसभरात अनेक वाहने मार्गक्रमण करीत असतात. या मार्गावरुन भाकरोंडी, रांगी, मानापूर, देलनवाडी, आरमोरीकडे दररोज शेकडो वाहने जात असतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावरील पुलाची कडा मोडकळीस आलेली आहे. परंतु या पुलाच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. पावसाळ्यात तात्पूरती सोय म्हणून गावातील नागरीक मोडकळीस आलेल्या कडेवर मुरुम टाकत असतात. यामुळे थोडाफार धोका टळतो. परंतु पूर आल्यास परिस्थिती ‘जैसे थे’ निर्माण होते. यापूर्वी या कडेवरुन काही वाहने उलटून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु सुदैवाने मोठा अपघात घडला नाही. नागरीकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. या मोडकळीस आलेल्या कडेची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.