वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज वृक्षारोपण जनजागृती दिंडीचा शुभारंभ

0
12

 गोंदिया, दि.२८ ःः – नागरिकांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्यावतीने आयोजित वृक्ष दिंडीला आजपासून (दि. २८ जून) सुरुवात होत आहे. सकाळी ११ वाजता नाट्या पटांगण, वांढरा  (चिचगढ), तह.देवरी गोंदिया येथे राज्य अर्थ-वित्त नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले असणार आहे. ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आमदार प्रा.अनिल सोले यांच्या पुढाकाराने सलग दोन वर्षांपासून वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.

प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार संजय पुराम, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नागो गाणार, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, मुख्य वनसंरक्षक संजीव गौंड, उपवनसंरक्षक मल्लिकार्जुन, वांढरा (चिचगढ) सरपंच मिराताई कुंजम, उपस्थित असणार आहे.

 राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्यभरात मोठ्या संख्येत पर्यावरण संरक्षणाबद्दल जनजागृती व संवर्धन कार्य सुरु आहे. त्यांनी स्वयंसेवी संस्थांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या हाकेला साथ देत ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनने तीन वर्षांपूर्वी वृक्ष दिंडीची सुरुवात केली होती. यावर्षी देखिल सहा दिवसांत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पर्यावरण प्रेमी 2000 किलोमिटरचा प्रवास करुन नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाबद्दल जनजागृती करत वृक्षारोपणही करणार आहे. यानंतर वृक्षदिंडी गोंदिया-भंडारा-गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा मार्गे मंगळवारी नागपूरात पोहोचणार आहे. या दम्यान सर्व जिल्ह्यांतील विविध गावांत वृक्षारोपण करणार आहे. वृक्ष दिंडीचे समारोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पं.वसंतराव देशपांडे सभागृहात होईल.

 या दिंडीचा शुभारंभ २८ जूनला देवरी येथून होणार आणि देवरी-कोहमारा- सडक अर्जुनी-गोरेगाव-गोंदिया असा प्रवास करून गोंदियाला मुक्कम असणार आहे. दि २९ जून रोज शुक्रवार सकाळी १० वाजता गोंदिया वन विभागातर्फे कार्यक्रम घेऊन तिरोडा-तुमसर-मोहाडी-भंडारा असा प्रवास करीत भंडारा येथे मुक्काम करणार आहे. ३० जून रोज शनिवारला लाखनी-पालांदूर- लाखांदूर-वडसा-आरमोरी-गडचिरोली आणि मुक्काम. १ जुलै रोज रविवारला गडचिरोली- चामोर्शी- पोंभुर्णा-चंद्रपूर- मुक्काम. २ जुलैला चंद्रपूर ते वर्धा आणि मुक्काम असा प्रवास राहणार आहे. 3 जुलै रोज मंगळवारला वर्धा- पवनार-सेलू- केळझर- खडकी- सिंदी-बुटीबोरी-नागपूर आणि समारोप असा वृक्ष दिंडी दौरा राहणार आहे.

  या संपूर्ण वृक्ष दिंडी दौऱ्यात आ. प्रा. अनिल सोले, अध्यक्ष, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन प्रामुख्याने उपस्थित राहणार असून वृक्षारोपण करण्याबाबत जनजागृती ते आपल्या मार्गदशनातून करणार आहेत. या संपूर्ण वृक्षदिंडीत त्यांच्यासोबत त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून यात जास्तीत जास्त वृक्षप्रेमी, नागरिक आणि लोकप्रतीनिधिनी भाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आ. प्रा अनिल सोले यांनी केले आहे.