मिशन मोडवर 13 कोटी वृक्ष लागवड पूर्ण करा-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
29

Ø  वृक्षारोपण जनजागृती दिंडीचा शुभारंभ

Ø  असेल वन तर टिकेल जीवन

गोंदिया, दि. 28 जून – मानवी जीवनात वनांचे अनन्य साधारण महत्व आहे. वृक्ष मानवाला प्राणवायू देतात आणि मानवच वनांचा व पर्यावरणाचा ऱ्हास करतो. याचाच परिणाम म्हणून  पाऊस कमी झाला 56 दिवसाचा पाऊस 18 दिवसांवर आला. हे दृष्ट चक्र थांबवायचे असेल वृक्ष लागवड व संवर्धन हाच एकमेव पर्याय असून 13 कोटी वृक्ष मिशन मोडवर पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन द्वारे चिचगड येथे आयोजित वृक्षारोपण जनजागृती दिंडीच्या शुभारंभ समारंभात ते बोलत होते.महाराष्ट्र शासनाच्या वृक्षारोपनाविषयी जनजागृती करण्यासाठी ही वृक्ष दिंडी काढण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील चिचगड येथे आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. ही दिंडी नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यातील गाव आणि शहरांमध्ये जनजागृती करणार आहे.

पालकमंत्री ना. राजकुमार बडोले हे कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास आमदार प्रा. अनिल सोले, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, आ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे,  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, उपवनसंरक्षक  युवराज, चिचगडचे सरपंच कल्पना गोस्वामी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामरतन राऊत  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्रीराम मंदिर देवस्थान चित्रकूट वांढरा चिचगड येथे  वृक्ष लावून दिंडीला सुरुवात करण्यात आली.यावेळी बोलताना वनमंत्री म्हणाले की, वनासाठी मनापासून अनमोल क्षण देणाऱ्या लोकांनी वृक्ष लागवडीचे व्रत घेतले आहे. वन संवर्धन हे सर्वांचे काम आहे. हे काम ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन स्वयंस्फुर्तपणे करीत असल्याने त्यांनी आ. अनिल सोले यांचे अभिनंदन केले. वृक्ष लागवड हे मिशन आहे. अनेक उत्सवात वृक्षाचे महत्त्व विषद आहे असे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले यांचे विद्य विना मती गेली हे आपण ऐकत आलो. आज ज्योतिबा असते तर वृक्षा विना जल गेले, जल विना शेती गेली, शेती विना धन गेले, आणि एवढे अनर्थ एका वनाने केले,  असे ते म्हणाले असते.

लोकांमध्ये मनापासून वन लावण्याची इच्छा निर्माण करा असे ते म्हणाले. पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या सामान्य माणसालाच  पर्यावरणाच्या ऱ्हासाचा अधिक त्रास  सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.   गोंदिया जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नक्की मदत केली जाईल,असे त्यांनी यावेळी सांगितले. मासेमारी करणाऱ्या भोई समाज बांधवांना मासेमारीची लीज कमी करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे श्रीराम मंदिर विकासासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला जाणार आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. वसुंधरा जगवायची असेल तर वृक्ष लागवड व संवर्धन हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. गोंदिया जिल्ह्याने गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्ष लावले आहेत. यावर्षी 31.64 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करू अशी खात्री त्यांनी दिली. नाविन्यपूर्ण योजनेत गेल्या वर्षी दोनशे सेंटीमीटरच्या वरील उंचीच्या वृक्ष संवर्धनासाठी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान दिले होते. ही योजना यावर्षी सुद्धा सुरू ठेवली जाणार असून दीडशे सेंटीमीटर उंचीच्या वृक्ष संवर्धनासाठी निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
68 गावातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा मोबदला मिळावा अशी मागणी करून आमदार संजय पुराम म्हणाले की, जिल्ह्यातील मध्यम सिंचन प्रकल्प वन विभागाच्या अडचणी मुळे रखडले आहेत ते पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. शासनाने चिचगडला अप्पर तहसिल कार्यालय मंजूर  केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. धारगड, कचारगड, हाजरा फॉलचा विकास शासन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अनिल सोले यांनी वृक्ष दिंडीच्या आयोजना मागील भूमिका आपल्या भाषणात विषद केली. वनमंत्री मनापासून ही मोहीम राबवित आहेत, त्यांना आपण साथ देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आज जर आपण लक्ष दिले नाही तर भविष्यात आपल्यावर पाश्चाताप करण्याची वेळ येईल असे ते म्हणाले. म्हणून आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन वृक्ष लागवड संवर्धन करू असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.यावेळी वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन बक्षीस, हरित सेने सदस्य प्रमाणपत्र, घरगुती गॅस कनेक्शनचे वाटप वनमंत्री व पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास गावकरी, वृक्षप्रेमी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवरी-कोहमारा- सडक अर्जुनी-गोरेगाव-गोंदिया असा प्रवास करून ही वृक्ष दिंडी गोंदियाला मुक्कम करणार आहे. 29 जून रोज शुक्रवार सकाळी 10 वाजता गोंदिया वन विभागातर्फे कार्यक्रम घेऊन तिरोडा-तुमसर-मोहाडी-भंडारा असा प्रवास करीत भंडारा येथे मुक्काम करणार आहे. 30 जून रोज शनिवारला लाखनी-पालांदूर- लाखांदूर-वडसा-आरमोरी-गडचिरोली आणि मुक्काम. 1 जुलै रोज रविवारला गडचिरोली- चामोर्शी- पोंभुर्णा-चंद्रपूर- मुक्काम 2 जुलैला चंद्रपूर ते वर्धा आणि मुक्काम असा प्रवास राहणार आहे. 3 जुलै रोज मंगळवारला वर्धा- पवनार-सेलू- केळझर- खडकी- सिंदी-बुटीबोरी-नागपूर आणि समारोप असा वृक्ष दिंडी दौरा राहणार आहे.

या संपूर्ण वृक्ष दिंडी दौऱ्यात आ. प्रा. अनिल सोले, अध्यक्ष, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन प्रामुख्याने उपस्थित राहणार असून वृक्षारोपण करण्याबाबत जनजागृती ते आपल्या मार्गदशनातून करणार आहेत.या संपूर्ण वृक्षदिंडीत त्यांच्यासोबत त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून यात जास्तीत जास्त वृक्षप्रेमी, नागरिक आणि लोकप्रतीनिधिनी भाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आ. प्रा अनिल सोले यांनी केले आहे.