राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या श्रीमती जलजा यांची अंगणवाड्यांना भेट, ग्रामस्थांशी संवाद

0
10

वाशिम, दि. २८ : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या विशेष प्रतिनिधी श्रीमती एस. जलजा यांनी २८ जून रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा व मंगरुळपीर तालूक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रांना भेट देऊन लाभार्थी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहूर्ले, गटविकास अधिकारी श्री. पराते, वैद्यकीय अधिकारी डॉ. नांदे, श्री डॉ. नवाते,तालुका कृषि अधिकारी श्री. शेळके, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. सोनटक्के, श्री. राऊत, गटशिक्षणाधिकारी श्री. डाबेराव, श्रीमती कौशल तसेच रुपेश निमके, श्री. माने, श्री. वाढणकर यांची उपस्थिती होती.

 श्रीमती जलजा यांनी कारंजा तालुक्यातील सोमठाणा येथील ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी केंद्राला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. इंदिरा आवास योजनेच्या लाभाबाबत लाभार्थ्यांशी चर्चा केली. अंगणवाडीच्या भेटीत अंगणवाडीवर टिन पत्र्याचे शेड असल्यामुळे नाराजी व्यक्त केली. मदतनिसाचे रिक्त पद तातडीने भरण्याचे निर्देश त्यांनी दिले. उंबर्डा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी तसेच कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अडीअडचणी व समस्यांबाबत चर्चा केली. कोळी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी रोजगार हमी योजनेच्या कामाबाबत चर्चा केली तसेच शेलूवाडा येथील ग्रामस्थांशी देखील संवाद साधला.

  मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन माता व अंगणवाडी सेविका यांच्याशी मुलांना व मातांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबत चर्चा केली, बालकांना पौष्टीक आहार देण्याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या. या अंगणवाडी केंद्रातील बाल ग्राम उपचार केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या दोन बालकांच्या पालकांशी चर्चा करुन करण्यात येत असलेल्या उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. अमायलेजयुक्त अन्न दिवसातून तीनवेळा व इतर वेगवेगळे पदार्थ व औषधी बालकांना देण्यात येते का, याबाबतची विचारणा देखील त्यांनी केली. अंगणवाडीचे बांधकाम हे गावात असून एक किलोमिटरपेक्षा जास्त अंतरावर करण्यात येत असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.