जिल्ह्यातील ८७ गावांना पुराचा धोका

0
13

गोंदिया,दि.29ःः मान्सून कालावधीत पूर परिस्थितीपासून संरक्षण व बचाव करण्यासाठी घरगुती साहित्याचे वापर करून जीवित व वित्तीय हानी कमी करण्याचे धडे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे जिल्हावासीयांना देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्था प्रशासन आणि नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी गोरेगाव येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील ८७ गावांना पुराचा धोका असल्याचेही सांगितले.
मान्सून कालावधीदरम्यान जिल्ह्यात वैनगंगा, गाढवी, वाघ, चुलबंद, बहेला, पांगोली नदीपासून येणार्‍या पुरापासून ८७ गावांना पुराचा धोका आहे. यासाठी सुरक्षा व बचाव करण्यासाठी २५ जून ते ३ जुलैपयर्ंत जिल्ह्यात प्रशिक्षण, जनजागृती कार्यशाळा राबविण्यात येत आहेत. गोंदिया तालुक्यात २५ जून रोजी भानपूर तलावात नागरिकांना तालीमचे प्रशिक्षण देण्यात आले. तिरोडा तालुक्यात चोरखमारा येथे नागरिकांनी आपत्ती प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला. पावसाळ्यात अनेक गावांत पूर परिस्थितीचे संकट निर्माण होते. त्यामुळे अनेकदा जीवित हानी तसेच मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागते. अशा परिस्थितीत हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पारंपारिक साधन व घरात उपलब्ध असलेल्या वस्तुंचा प्रयोग करून आपत्तीला तोंड देण्यास मदत मिळते, यावर जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात एसडीआरएफ नागपूरच्या चमूने आपत्तीच्या वेळेस घेण्यात येणारी दक्षता, घरात उपलब्ध असणारे साधनांचा आपत्तीच्या वेळेस उपयोग, सर्पदंश, वीजपासून संरक्षण तसेच मानवी शरीराच्या अवयवासंदर्भात माहिती देत आहेत. बचाव व राहत कार्य उपयोगात येणारी साहित्य व साधने, औजार, स्वयंचलित डोंगे, कटर, सक्यरुलर सॉ, चैन सॉ, बोल्ट कटर आदी साहित्य पूर परिस्थितीत कसे उपयोगी पडतात याची माहिती दिली. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद चमूचा दौरा २८ जून रोजी पुजारीटोला जलाशय, २९ जून रोजी नवेगावबांध जलाशय, ३0 जून रोजी इटियाडोह जलाशय व १ जुलै रोजी हाजराफॉल जलाशय, २ जुलै रोजी शिरपूर जलाशय तसेच ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पावसाळ्याच्या दिवसांत पूर परिस्थितीपासून संरक्षण व बचाव करण्यासाठी नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.