वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन हे एक व्रतच : आ. प्रा. सोले

0
20
गोंदिया,दि.२९ः-पन्नास वर्षापूर्वी पाणी विकत घ्यावे लागत नव्हते. इंधन विकत घ्यावे लागत नव्हते. मात्र ही परिस्थिती बदलली असून आपल्या आजिवीकेतून पाणी, इंधनासारख्या गोष्टीला पैसे मोजावे लागत आहे. पर्यावरणातील प्राणवायूचे प्रमाण आज आपण संतुलीत करू शकलो नाही तर २५ ते ३० वर्षानंतर प्राणवायूही विकत घ्यावा लागेल. अशी भिषण स्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर आपण सर्वांनी वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन हे व्रत व मिशन म्हणूनच घ्यावे, असे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.
ते ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून निघालेल्या वृक्षदींडीचे गोंदिया येथे आगमन झाल्यावर वनविभागातर्फे कन्हारटोली येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. स्वतः वृक्षरोपन व संवर्धन करून आदर्श निर्माण करणारे कमीच आहेत. आजघडीला राज्यात ३३ टक्के वन आच्छादनाची गरज आहे. मात्र, फक्त २०.४ टक्के वनआच्छादित भाग राज्यात आहे. हे उद्दीष्ट गाठण्याकरीता चारशे कोटी वृक्ष लावावे लागतील. विकासाच्या कामाकरीता वृक्ष कापावे लागतात. एक वृक्ष कापल्यावर दहा वृक्ष लावण्याचे प्रयत्न आपण कधी केले नाही. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. संत तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेङ्क या शिकवणीतून आपल्या भूमातेला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सर्वांनी संकल्प घेऊन वृक्षारोपनाचे हे मिशन पूर्णत्वास न्यावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी वृक्षारोपन व संवर्धनात उत्कृष्ट कार्य करणारे माधव गारसे व सर्पमित्र बंटी शर्मा यांचे प्रमाणपत्र देऊन आ. सोले यांनी सत्कार केला. यावेळी कलापथकाच्या माध्यमातून परिसरात पथनाट्य प्रस्तूत करण्यात आले. परिसरातील कृष्णा मेहता या चिमुकलीने वृक्षारोपनावर स्वतः तयार केलेली कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. वनसंरक्षक नरेंद्र शेंडे यांनी केले. संचालन जयंत शुक्ला यांनी तर आभार ए. एन. साळवे यांनी मानले.