हेल्थ वेलनेस योजनेत गोंदिया तालुक्याचा समावेश

0
11

गोंदिया, दि.0१ःः: केंद्र शासनाने गोंदिया तालुक्याचा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हेल्थ वेलनेस योजनेमध्ये समावेश केला. त्यामुळे या तालुक्यातील ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये एक विशेष बीएएमएस (आयुवैदिक) डॉक्टर व अतिरिकक्त परिचर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांपैकी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे केवळ गोंदिया तालुक्याचाच या योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. योजना लागू झाल्यामुळे वृद्ध नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच कॅन्सर पीडितांना नियमित औषधी या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांचा मागील वर्षापासून हेल्थ वेलनेस स्कीम अंतर्गत समावेश करण्यात आला होता. तेथील सर्व आरोग्य उपकेंद्रांवर बीएएमएस डॉक्टराच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु गोंदिया जिल्ह्याला या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले होते. या संदर्भात आ. अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाकडून प्रस्ताव तयार करुन गोंदिया तालुक्याला हेल्थ वेलनेस स्कीम अंतर्गत सहभागी करण्याच्या शिफारशीसह प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. केंद्र शासनाच्या स्तरावर शेवटी गोंदिया तालुक्याचा या योजनेत समावेश झाला. गोंदिया तालुक्याचा हेल्थ वेलनेस स्कीममध्ये समावेश करून दिल्याबद्दल जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, जि.प. सभापती रमेश अंबुले, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, तालुका अध्यक्ष प्रकाश रहमतकर, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प. सभापती विमल नागपुरे, पी.जी. कटरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे आदींनी आ. अग्रवाल यांचे आभार मानले.