मुद्रा योजनेची प्रकरणे तातडीने निकाली काढा – राजकुमार बडोले

0
11

सडक/अर्जुनी,दि.३ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक गरजू व बेरोजगार युवक-युवती स्वावलंबी झाली पाहिजे असा संकल्प आहे. यासाठी जास्तीत जास्त बेरोजगार व गरजू व्यक्तींना मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी मुद्रा योजनेची प्रकरणे तातडीने निकाली काढा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
पंचायत समिती सभागृह सडक/अर्जुनी येथे २ जुलै रोजी पालकमंत्री श्री.बडोले यांच्या अध्यक्षतेखाली मुद्रा योजनेचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सभेला सडक/अर्जुनी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, अर्जुनी/मोर पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य शिला चव्हाण, पं.स.सदस्य दिलीप चौधरी, माजी पं.स.सभापती कविता रंगारी, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्लारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.बडोले यावेळी म्हणाले, मुद्रा योजनेबाबत ज्या बँकांना शिशु, किशोर व तरुण या गटाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे ते त्यांनी वेळेत पूर्ण करावे. या योजनेची माहिती घेण्यासाठी कोणत्याही बेरोजगार व्यक्तींची बँकेत आल्यानंतर निराशा होणार नाही याची काळजी घ्यावी व त्यांना या योजनेबाबत विस्तृत माहिती देवून सहकार्य करावे. अनेक बेरोजगार व गरजू व्यक्ती छोटे-छोटे उद्योग व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक आहेत अशा व्यक्तींना मुद्रा योजनेतून बँकांनी योग्य ते सहकार्य करावे. त्यामुळे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल असे सांगून ते पुढे म्हणाले, बँकांनी मुद्रा योजनेतून बेरोजगार व गरजू व्यक्तींना कर्ज देतांना सामाजिक बांधीलकी जोपासली पाहिजे. मुद्रा योजनेतून रोजगार उभारण्यासाठी बँकेमध्ये येणाऱ्या गरजू व्यक्तीला समाधानकारक उत्तरे दिली पाहिजे. अनेक बँका बेरोजगार व गरजू व्यक्तींना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी बेरोजगार व गरजू व्यक्ती करीत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या तक्रारी येणार नाही याबाबत सर्व बँकांनी दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले.
श्री.सिल्लारे म्हणाले, मुद्रा योजना बेरोजगार व गरजू व्यक्तींसाठी आशेचा किरण आहे. त्यांना गावपातळीवर व आपल्या परिसरात उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मदत करावी. बचतगटाच्या महिलांना देखील मुद्रा योजनेतून कर्ज प्रकरणे मंजूर करावी. बेरोजगार, होतकरु व गरजू व्यक्तीला स्वबळावर उभे करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला उपजिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी राहूल खांडेभराड, सडक/अर्जुनी तहसिलदार अखिलभारत मेश्राम, गोरेगाव तहसिलदार अरविंद हिंगे, नायब तहसिलदार नवनाथ कठाडे, अर्जुनी/मोर गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सडक/अर्जुनी गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांचेसह ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, युनीयन बँक, एचडीएफसी बँक यांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी(कृषि) राजकुमार उगले यांनी मानले