स्त्रीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका-शारदा बडोले

0
12

महिला आरोग्य अभियानाचा शुभारंभ
* वात्सल्य रुग्णवाहिकेचे लोकार्पण
* महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

गोंदिया, दि.२६ : देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. स्त्री आणि पुरुष हे जीवनरथाचे दोन चाके आहेत. जीवनरथ चांगल्याप्रकारे चालण्यासाठी पुरुषांनी स्त्रीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. असे मत श्रीमती शारदा राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
आज (ता.२६) बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या महिला आरोग्य अभियान पंधरवाड्याचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या पत्नी शारदाताई बडोले यांनी केले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते होते. प्रमुख अतिथी म्हणून दंत शल्यचिकित्सक डॉ.अंशू सैनी, डॉ.दिपक बहेकार, लॉयंस क्लबचे अध्यक्ष कालुराम अग्रवाल, प्रा.सविता बेदरकर, प्रा.माधुरी नासरे, डॉ.सीमा यादव, शिल्पा अग्रवाल, धर्मीष्ठा सेंगर, दिव्या भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती बडोले पुढे म्हणाल्या, श्रमाची कामे मोठ्या प्रमाणात स्त्रीया करतात. कुटुंबाची महत्वपूर्ण जबाबदारीही महिला यशस्वीपणे सांभाळतात. हे सर्व करीत असतांना त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. देशाच्या प्रगतीत महत्वाचा वाटा असलेल्या स्त्रीया ह्या आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने महिला आरोग्य अभियानातून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले आहे. शासनाचे हे अभियान कौतुकास्पद असून जिल्ह्यातील महिलांना या अभियानाचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहनही याप्रसंगी श्रीमती बडोले यांनी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते म्हणाले, जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्याप्रकारच्या आरोग्यसेवा देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. शासनाच्या आरोग्यसेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करुन डॉ.धकाते म्हणाले, महागड्या आरोग्यसेवा लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना उपलब्ध होणार आहे. कोबाल्ट युनिट जिल्ह्यासाठी मंजूर झाल्याचे सांगून डॉ.धकाते म्हणाले, या युनिटमुळे जिल्ह्यातील कर्करुग्णांना जिल्ह्यातच भविष्यात उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. महिला आरोग्य अभियानामुळे महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.अंशू सैनी म्हणाल्या, आजची स्त्री कामाच्या व्यस्ततेमुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे त्यांना मोठ्याप्रमाणात ॲनिमीया होतो. देशातील ८५ टक्के स्त्रीया ॲनिमीयाग्रस्त असल्याचे सांगून डॉ.सैनी म्हणाल्या, महिलांनी दातांची निगा राखावी. आपल्या आरोग्याकडील दुर्लक्षामुळे आपण आजार ओढवून घेतो. महिलांनी आरोग्य अभियानादरम्यान आरोग्य तपासणी करुन आरोग्याची काळजी घ्यावी व निरोगी राहावे असेही त्या म्हणाल्या.
प्रा.श्रीमती बेदरकर म्हणाल्या, देशातील स्त्री जर सक्षम असेल तर तो देश प्रगती करतो. स्त्रीयांनी सुदृढ असले पाहिजे. ती आजारी पडणारच नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे. स्त्री सुदृढ असली तर जन्माला येणार बालक सुदृढ असतो. प्रत्येक स्त्रीने आपण आरोग्यसंपन्न कसे राहू याकडे लक्ष दिले पाहिजे.
डॉ.दिपक बहेकार म्हणाले, स्त्री-पुरुष भेदभाव मिटला पाहिजे. आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याचा खांदा लावून चांगले काम करीत आहेत. मुलगी ही दोन्ही घरचा उद्धार करीत असल्यामुळे तिच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. तसेच महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे. केवळ कायद्याच्या उपयोगातून हे होणार नाही तर त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. महिलांनी निरोगी राहण्यासाठी चांगला आहार घ्यावा व आरोग्याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.
प्रा.श्रीमती नासरे म्हणाल्या, महिला आरोग्य अभियानासारख्या कार्यक्रमातून महिलांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. महिलांनी आरोग्याची काळजी घेतांना रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धा दूर ठेवाव्यात. श्रीमती शारदा बडोले यांचा डॉ.अंशू सैनी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व बाई गंगाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले.
प्रारंभी श्रीमती शारदा बडोले यांच्या हस्ते वात्सल्य या ॲम्बुलंसचे लोकार्पण आणि महिला समुपदेशन केंद्राचे फित कापून उदघाटन करण्यात आले. लॉयंस क्लबचे अध्यक्ष कालुराम अग्रवाल यांनी वात्सल्य ॲम्बुलंससाठी एलसीडी टीव्ही भेट दिला. गरोदर मातांना बाळंतपणासाठी शासकीय रुग्णालयात आणणे आणि बाळंतपणानंतर माता व बालकाला घरी सुखरुप सोडून देण्याचे काम वात्सल्य या रुग्णवाहिकेतून करण्यात येणार आहे. ॲम्बुलंसवरील माता व बालिकेचे चित्र आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करु या हा संदेश, स्त्री भ्रुण हत्या रोखण्याची जनजागृती करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके यांनी केले. संचालन डॉ.भावना बजारे यांनी, तर उपस्थितांचे आभार रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी मानले. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दुधे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद वाघमारे, डॉ.अमरीश मोहबे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.सायस केंद्रे, डॉ.तृप्ती कटरे, डॉ.प्रियंका उभाळ, डॉ.दुर्गाप्रसाद पटले, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.