श्रीलंकेचा ९२ धावांनी बांगलादेशवर विजय

0
6

मेलबर्न – विश्वचषकाच्या ‘अ’ गटातील बांगलादेशविरुद्धच्या लढतीत श्रीलंकेने ९२ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात एक बाद ३३२ धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेचा संपूर्ण संघ २४० धावांत बाद झाला.
विश्वचषकात सलामीच्या सामन्यात न्यूझींलडकडून मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर अफगाणिस्तान आणि त्यानंतर आजच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवत माजी जगज्जेत्या श्रीलंका संघाने फॉर्म परत मिळवल्याचे दाखवून दिले. या सामन्यात श्रीलंकेने केवळ एक गडी गमावत ३३२ धावा केल्या.
सलमीवीर तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा यांची भागीदारी श्रीलंकेच्या विजयास कारणीभूत ठरली. तिलकरत्ने दिलशानने १४६ चेंडूत २२ चौकार लगावत १६१ धावांची नाबाद खेळी केली तर कुमार संगकाराने १०५ धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. ७६ चेंडूत त्याने १३ चौकार आणि एक षटकारासह १०५ धावा केल्या. तिलकरत्ने दिलशानने दिडशतकी धावांची खेळी कऱण्यासोबत बांगलादेशच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडत अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडवले.
मैदानात जिंकण्याच्या ईर्ष्येने उतरेलल्या श्रीलंका संघाने सुरुवातच दमदार केली. सलामीवीर लाहिरु थिरिमनेने अर्धशतक साकारले. तो ५२ धावांवर बाद झाला. त्यानंतर संगकारा आणि दिलशान यांनी खेळपट्टीवर जम बसवला आणि बांगलादेशची गोलंदाजी फोडून काढली. या दोघांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहत नाबाद २१० धावांची भागीदारी केली.
श्रीलंकेने ठेवलेले ३३३ धावांचे भलेमोठे आव्हान पेलताना मात्र बांगलादेशचा डाव अवघ्या २४० धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशच्या शाकिब अल हसन(४६) आणि शब्बिर रहमान(५३) यां दोन फलंदाजांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. श्रीलंकन गोलंदाजीसमोर बांगलादेशचा अवघा संघ २४० धावांत तंबूत परतला. सामन्यात बांगलादेशच्या तीन फलंदाजांना श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भोपळा न फोडताही माघारी धाडले. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर सुरंगा लकमल आणि तिलकरत्ने दिलशान यांनी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका – एक बाद ३३२ विजयी(तिलकरत्ने दिलशान(१६१), कुमार संगकारा(१०५), लाहिरु थिरिमने(५२)
विरुद्ध बांगलादेश – सर्व बाद २४०(शाकिब अल हसन(४६), शब्बिर रहमान(५३))