मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यास मदत- आ.संजय पुराम

0
9

आमगाव ,दि.7 : आज महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. या संघटनात माविमचा मोलाचा वाटा आहे. माविममुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असून त्या उद्योजक बनत आहेत. आज महिलांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनविण्यासाठी बँकांनी आता मुद्रा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करुन देवून त्यांना स्वावलंबी होण्यास मदत करावी. असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने ३ जुलै रोजी आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेज येथे आयोजित स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावाचे उदघाटक म्हणून श्री.पुराम बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य छबू उके, सिंधू भूते, तहसिलदार साहेबराव राठोड, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे व महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके यांची उपस्थिती होती.
श्री.पुराम पुढे म्हणाले, बचतगटातील महिलांनी प्रधानमंत्री जनधन योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ घेण्याकरीता बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या सुरक्षेची हमी शासनाने घेतली आहे. उद्योग हा महिलांच्या भावी जीवनासाठी फायदेशीर आहे. महिला उत्कृष्ट उद्योजक बनू शकतात. त्यासाठी महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीमती सिंधू भूते व छबू उके यांनी आपल्या मनोगतातून महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत असे सांगून महिलांना उद्योग सुरु करण्यास प्रोत्साहित केले. रजनी रामटेके यांनी बचतगटाच्या माध्यमातून जी संधी मिळते त्याचे सोनं करणे हे महिलांच्या हातात आहे असे सांगून महिलांच्या सुरक्षेबाबत कोणकोणते कायदे आहेत याबद्दल त्यांनी माहिती दिली. सविता पुराम यांनी महिलांनी राजकीय क्षेत्रात येवून आपल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करावा असे सांगितले. नीरज जागरे यांनी नाबार्डच्या विविध योजनांबद्दल माहिती देवून महिलांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ग्रामीण बँक व कॅनरा बँकमार्फत बचतगटाच्या १२ महिलांना १०.५० लाख कर्ज प्रकरणाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तहसिल कार्यालयामार्फत राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत २० हजार रुपये १० महिलांना देण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रेरणा पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच गाव निर्मल केल्याबद्दल उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून आयोग ग्रामसंस्था अंजोरा, कल्याणी ग्रामसंस्था किकरीपार, वैष्णवी ग्रामसंस्था बामणी यांचा सत्कार करण्यात आला. ५६ महिलांना कृषि औजार (मिनी कीट) आत्मा विभागातर्फे देण्यात आले. आमगाव तालुक्यातील २५ गटातील २५ महिलांना १०० टक्के अनुदानावर आत्मसन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात माविमच्या वतीने दिवा वाती बनविण्याच्या मशीन देण्यात आल्या. महिलांनी उत्पादीत केलेल्या दिवा वाती कविरा सोल्यूशन ही कंपनी विकत घेणार आहे.
प्रारंभी महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध बचतगटांचे वस्तू व साहित्य विक्रीचे स्टॉलला मान्यवरांनी भेट देवून उत्पादीत केलेल्या वस्तूंच्या मार्केटींगबाबत माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, प्रिया बेलेकर, एकांत वरघने, स्वावलंबन सीएमआरसी कार्यकारिणी मंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार सीएमआरसी व्यवस्थापक आशा दखणे यांनी मानले.