पालकमंत्र्यांची बाई गंगाबाई रुग्णालयाला भेट;रुग्णालयातील अव्यवस्थेची केली पाहणी

0
8

प्रशासनाला समिती तयार करण्याचे दिले निर्देश
गोंदिया,दि.८ : बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज ८ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, न.प.मुख्याधिकारी चंदन पाटील, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, बाई गंगाबाई रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.केंद्रे,जि.प.सदस्य छाया दसरे, माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुनिल केलनका, नगरसेवक भरत क्षत्रीय यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मागील काही दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील वार्डात पाणी शिरुन रुग्णांना त्रास सहन करावा लागला. याची गंभीर दघल घेवून पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी रुग्णालयाला भेट देवून तिथे असलेल्या अव्यवस्थेची पाहणी केली. शेडचे बांधकाम व इतर बांधकाम करतांना पाण्याचे विल्वेवाट करण्यासाठी योग्य ती व्यवस्था न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्ष पाहणी करतांना निदर्शनास आले. या प्रकरणात लापरवाही करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच त्वरित कार्यवाही करुन सुधारणा करण्याचे आदेश दिले.
दरम्यान रुग्णालय परिसरात होत असलेल्या अस्वच्छतेबाबत पालकमंत्री बडोले यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी लक्ष्य वेधले असता त्यांनी न.प.मुख्याधिकारी चंदन पाटील यांना रुग्णालय परिसरात स्वच्छता ठेवण्यासंदर्भात निर्देश दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी रुगणालयात वेळोवेळी उदभवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याकरीता समिती गठीत करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले.