दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न- राजकुमार बडोले

0
24

दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम
गोंदिया,दि.८ : जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रापासून वंचित आहे. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहिम कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग प्रमाणपत्रासून वंचित राहणार नाही यासाठी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्राचे प्रमाण शुन्य टक्के करण्याचा निर्धार केला आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गोंदिया येथे ८ जुलै रोजी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र शुन्य टक्के प्रमाण या विशेष मोहिमेअंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांनी केले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सिमा मडावी होत्या. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प.सदस्य छाया दसरे व विजय लोणारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.बडोले पुढे म्हणाले, राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा की जेथे अपंगत्वाचे १०० टक्के प्रमाणपत्र देण्याचे काम या कार्यक्रमातून करण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांग बांधवांसाठी ३ टक्के निधी दिला आहे. त्या निधीचा योग्य वापर करणे सुरु असून निश्चितच बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्याच्या यशस्वीतेसाठी अनेक यंत्रणांनी चांगले सहकार्य केले आहे. दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेले साहित्य देखील शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत आहे. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तयार झाल्यामुळे त्यांना आता संजय गांधी निराधार योजना, अपंग शिष्यवृत्ती, रेल्वे, एस.टी.सवलत, रमाई घरकूल, अपंग विवाह अनुदान, कृत्रिम अवयव व साहित्य आदी शासकीय योजनांचा लाभ घेणे सोईचे झाले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्याचा हा अभिनव यशस्वी प्रयोग आता संपूर्ण महाराष्ट्रात सुध्दा राबविण्याचा संकल्प आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे व जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन दिव्यांग बांधवांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्ह्यात प्रथमच विशेष मोहिम कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र १०० टक्के वाटपाचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ मार्च २०१८ दरम्यान विशेष मोहिम राबवून मिशन झीरो पेंडन्सी अंतर्गत जिल्ह्यातील एकूण ३५०० लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्धार करण्यात आला व हा अभिनव प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात काही दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसूदन धारगावे, डॉ.अशोक चौरसीया, डॉ.राजेंद्र जैन, माजी नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांचेसह दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत राऊत यांनी केले. संचालन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी केले, उपस्थितांचे आभार समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी मानले.