खा.कुकडेंनी केली बीजीडब्लूची पाहणी

0
7

गोंदिया,दि.11 : गेल्या गुरुवारला आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या वार्डात पाणी साचल्याने विदारक परिस्थिती निर्माण झाली होती.त्या मुद्याला प्रसारमाध्यमांनी चांगलेच लावून धरल्याने मुख्यमंत्र्यापासून पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनाही त्याची दखल घ्यावी लागली.जिल्हाधिकारी ,पालकमंत्री यानी भेट दिल्यानंतर काल मंगळवारला (दि.१०) खा. मधुकर कुकडे यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला आकस्मीक भेट देवून पाहणी केली. रुग्णालयाच्या आवारातील घाणीचे साम्राज्य पाहुन कुकडे चांगलेच संतापले. रुग्णालयाच्या साफ सफाईचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराचे बिले रोखून त्यांना नोटीस बजाविण्याचे निर्देश शासकीय वैद्यकीय महविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांना दिले. रुग्णालयातील विविध असुविधांवरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

कुकडे यांनी सुरूवातीेला रुग्णालयाच्या सांडपाण्याचा निचरा होणाऱ्या नाल्याची व गटाराची पाहणी केली. तसेच रुग्णालयाच्या आवारात नाल्या व त्या परिसरात साचलेला केरकचरा पाहून अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. या केरकचऱ्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या रुग्णालयात महिला आणि नवजात बालके दाखल आहेत. अशा दूषीत वातावरणामुळे त्यांना आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रूग्णालयाच्या साफ सफाईचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराला नोटीस बजावून नियमित चांगली साफ करण्यास सांगीतले. अन्यथा सदर कंत्राटदाराची बिले थांबविण्याचे निर्देश रूखमोडे यांना दिले. या भेटी दरम्यान त्यांनी महिला आणि बालके दाखल असलेल्या वार्डाची व त्यांना मिळत असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली. या वेळी नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक खंडाते व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,अशोक शहारे,जितेश टेंभरे,नानू मुदलीयार,बाळकृष्ण पटले उपस्थित होते.