झाडे, झाडिया समाजाला भटक्या जमातीचे प्रमाणपत्र द्या: आ.डॉ.देवराव होळी

0
16

गडचिरोली,दि.११: गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असलेल्या झाडे, झाडिया समाजाला भटक्या जमातीचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी आज विधानसभेत केली.

आज आ.डॉ.देवराव होळी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करुन झाडे, झाडिया समाजाच्या समस्यांबाबत विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधले. आ.डॉ.होळी यांनी सांगितले की, झाडे कुणबी, झाड्या कुणबी, कापू झाडे, कापेवार या समाजाचे अनेक लोक गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. या समाजाच्या लोकांचा पूर्वी भटक्या जमातीत समावेश होता व त्यांना तसे प्रमाणपत्रही दिले जात होते. परंतु २०१६ पासून शासनाने अशा प्रकारचे प्रमाणपत्र देणे बंद केल्याने या समाजातील विद्यार्थी व नोकरी करु इच्छिणाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे झाडे, झाडिया समाजातील नागरिकांना तत्काळ भटक्या जमातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी आ.डॉ.होळी यांनी केली. प्रमाणपत्र मिळत नसल्याने नोकरी मिळणार नाही म्हणून या समाजातील विद्यार्थ्यांनी शाळेवरच बहिष्कार टाकल्याची गंभीर बाबही आ.डॉ.होळी यांनी विधानसभा अध्यक्षांच्या लक्षात आणून दिली.