विधानभवन परिसरात नवीन विस्तारीत इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ

0
9

नागपूर, दि. 11 जुलै :  विधानभवनाच्या मुख्य इमारतीच्या पश्चिम बाजुला असलेल्या विस्तारीत दोन मजली इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. विस्तारीत इमारत येत्या दहा महिण्यात पूर्ण करण्यात येणार असून या इमारतीमध्ये मंत्री दालने तसेच उपहारगृह आदी सुविधा राहणार आहेत.
विधानभवन परिसरात विस्तारीत इमारत बांधकामाचा शुभारंभाप्रसंगी विधान परिषदेचे सभापती राम राजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, विधी मंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे तसेच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानभवन परिसरात मुख्य इमारतीच्या पश्चिम बाजुला तळमजलासह दोन मजली इमारत बांधण्यात येत असून या बांधकामासाठी 10 कोटी 53 लक्ष 50 हजार रुपये खर्च येणार आहे. विधानभवन येथील सद्या अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेमध्ये मंत्री दालनाचे संख्या व त्याचा आकार कमी पडत असल्यामुळे अतिरिक्त 12 मंत्री दालनाचे बांधकाम करण्यात येत असून विस्तारीत बांधकाम हे मुख्यइमारतीच्या बांधकाम आराखड्यानुसारच करण्यात येणार असून मुख्य इमारतीचा एक विस्तारीत भाग राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या इमारतीच्या बांधकामाचे आवश्यक असलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर तातडीने या विस्तारीत इमारतीच्या प्रत्यक्ष
बांधकामाला सुरुवात होणार आहे.
प्रारंभी विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात विधानभवनाच्या मुख्य इमारतीच्या पश्चिम बाजूस बांधण्यात येत असलेल्या विस्तारीत इमारतीच्या बांधकामाबद्दल माहिती दिली. या विस्तारीत इमारतीचे बांधकाम येत्या दहा महिण्यात पूर्ण करण्यात येत असून तळमजला व प्रथम मजल्यावर मंत्री महोदयांसाठी दालने तसेच द्वितीय मजल्यावर उपहारगृहाचे बांधकाम होत असल्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनानिमित्त मंत्री महोदयांसाठी आवश्यकतेनुसार दालन व्यवस्था निर्माण करणे सुलभ होणार आहे.
यावेळी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सैनिक, बांधकाम सचिव अजित सगणे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिका आयुक्त विरेंद्र सिंग, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता पी.डी.नवघरे, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, विधीमंडळ सचिवालयाचे सहसचिव अ.ना.मोहिते, उपसचिव वि.गो. आठवले आदी यावेळी उपस्थित होते.