केशोरीचा आशीष बनला उपप्रादेशिक अधिकारी

0
7

अर्जुनी मोरगाव,दि.13ः-तालुक्यातील केशोरी येथे डॉ.राधाकृष्णन माध्यमिक विद्यालय येथे माध्यमिक शिक्षण घेतलेल्या आशीष शामदेव रेहपाडे याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी वर्ग १ च्या लेखी परीक्षेत यश संपादन केले आहे. आशीष प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी वर्ग १ या पदासाठी पात्र ठरला. त्यामुळे आशिषची उपप्रादेशिक अधिकारी म्हणून मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. आशीषने ग्रामीण भागातीलही विद्यार्थी श्रेणी-१ चे अधिकारी होऊ शकतात, हे सिध्द करून दिले आहे.
आशिष रेहपाडेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केशोरी येथील डॉ.राधाकृष्णन हायस्कूल येथे पूर्ण केले. यानंतर नागपूर येथून त्याने केमिकल अभ्यासक्रमातून अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतले. पदवीनंतर आशीषने लोकसेवा आयोगची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामुळे आशिष हा रक्षा मंत्रालयामध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत होता.
परंतु, शिक्षणाची आवड असल्यामुळे त्याने उच्च अधिकारी होण्याचा हट्ट सोडला नव्हता. त्यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी वर्ग १ पदासाठी लेखी परीक्षा दिली. या परीक्षेत आशिषने प्राविण्य प्राप्त केले. दरम्यान त्याची नियुक्ती मुंबई येथे झाली आहे. आशीषच्या या यशाचे केशोरी परिसरात कौतुक केले जात आहे. आशीषने यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे.