दीड वर्षात वनविभागाचा बंधारा गेला वाहून

0
7

गडचिरोली,दि.13ःवनपरिक्षेत्र अधिकारी (उत्तर) धानोराच्या यंत्रणेव्दारे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमधून २0१६ मध्ये बांधलेला बंधारा दीड वर्षातच वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी (उत्तर) धानोराच्या यंत्रणेव्दारे रोजगार हमी योजनेतून सन २0१६ मध्ये बंधार्‍याचे बांधकाम करण्यात आले. मात्र बंधारा बांधकामात लोकल गिट्टी व निकृष्ट साहित्य वापर करून बंधार्‍याचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे दीड वर्षातच बंधारा वाहून गेल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
सदर बंधार्‍याचे कक्ष क्र. ५५३ मध्ये बांधकाम करण्यात आले. या बंधार्‍याची किंमत ८.८0 लक्ष असून बंधारा कागदोपत्रीच उत्कृष्ट असल्याचे दाखविण्यात आल्याचे चित्र यावरून दिसून येते. या बंधार्‍यावर तब्बल कुशल व अकुशल ७ लक्ष ६१ हजार रूपये खर्च करून ऑक्टोबर २0१६ मध्ये काम पूर्ण करण्यात आले होते. दीड वर्षातच जर बंधारा फुटला असेल तर शासन भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी (उत्तर) धानोरा चेतना म्हस्के यांना विचारणा केली असता, योग्य चौकशी करून वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती दिली.