गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम तातडीने करा – राजकुमार बडोले

0
9
????????????????????????????????????

* जिल्ह्यातील रुग्णालयांची आढावा बैठक

नागपूर, दि. 13 : गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विस्ताराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून महाविद्यालय परिसरातील इमारतींचे बांधकाम तातडीने करावे, अशा सूचना गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिल्या. रविभवन येथे गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व बाई
गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथील बांधकामाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आढावा घेतला.यावेळी वित्त विभागाचे सचिव नितीन गद्रे, गोंदियाच्या जिल्हाधिकारी श्रीमती डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. राजा दयानिधी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य सुविधा ही अत्यावश्यक सेवा असल्याने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयाच्या विस्ताराला मंजूरी देण्यात आली. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालय परिसरात रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची व्यवस्था, संरक्षण भिंत अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कामांना गती देण्यात यावी, असे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील बांधकाम टप्प्या-टप्प्याने करावे.त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.जिल्हाधिकारी श्रीमती डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महाविद्यालय व रुग्णालय परिसरात असलेल्या वैद्यकीय अनावश्यक साहित्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत जूनी असल्याने त्याचे भविष्याच्या दृष्टीने स्ट्रक्टरल ऑडीट करणे आवश्यक आहे. त्या अनुशंगाने बांधकाम विभागाने जून्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीटचा प्रस्ताव व्हीएनआयटीला दिला आहे. या प्रस्तावावर निर्णय झाल्यास रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांवर पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी चर्चा केली. यावेळी शिक्षकांच्या समस्यांवर कायदेशीर सल्ला घेण्याच्या सूचना पालकमंत्री बडोले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. राजा दयानिधी यांना दिल्या.याशिवाय शिक्षकांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीकरतील, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.