व्यसनमुक्तीसाठी कृती आराखडा तयार करा

0
7

गडचिरोली,दि.14 : दारु व तंबाखुमुक्तीसाठी करण्याबाबत प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन १५ दिवसांत सादर करावा आणि त्यानुसार काम सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी येथे दिले.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेला सर्चचे संचालक डॉ.अभय बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, डीएचओ शशिकांत शंभरकर, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी आदी उपस्थित होते.
जिल्हयात दरवर्षी २ हजार ५०० लोक तंबाखुयुक्त पदार्थांच्या व्यसनी जातात आणि यामुळे दरवर्षी १३ हजार नागरिक तंबाखुमूळे दारिद्र्यात लोटले जात आहेत. जिल्ह्यात तंबाखुयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी ७३ कोटी रुपये खर्च होत असल्याचा निष्कर्ष निघालेला आहे. अगदी कमी वयात तंबाखूचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. मुखकर्करोग प्रतिबंधासाठी तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन बंद करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी केले.
तंबाखू व दारुमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत सहभागी व अंमलबजावणी करणाºया कार्यालयांनी प्रथम व्यसनमुक्त कार्यालय झाल्याचे जाहीर करुन तसा फलक दर्शनी भागावर लावावा, अशा सूचना यापुर्वीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालय प्रमुख व शाखा प्रमुख यांनी पुढील १५ दिवसात दारु व तंबाखू नियंत्रणाबाबत कृती कार्यक्रम आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.
याप्रसंगी डॉ.अभय बंग म्हणाले, अन्न व औषध विभागाने पोलिसांना सहकार्य करुन प्रथम तालुक्याच्या ठिकाणी कडक कारवाई करावी. या कारवाईचा परिणाम आपोआपच जिल्हाभरातील गावांमध्ये पोहचायला वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे प्रथम स्वत:चे कार्यालय, समाज या व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढा असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.